जालना, दि. 30 (जिमाका) – केंद्र शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जालना जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. सुखी जीवनासाठी कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेने अवश्य घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
विकसित भारत संकल्प यात्रेत आज बदनापूर तालुक्यातील ढासला या गावात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमास आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सरपंच राम पाटील, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, तहसिलदार सुमन मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा कृषी अधिक्षक गहिनीनाथ कापसे, गट विस्तार अधिकारी ज्योती राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र शासन हे लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवित आहे. उज्वला गॅस, जनधन योजना, आयुष्यमान योजना या सारख्या योजनांमुळे सर्वसामान्य व्यक्तींमध्ये समाधान निर्माण झाले आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा होत असल्याने भ्रष्टाचारालाही आळा बसला आहे. राज्यशासनाच्या विविध योजनांचीही प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. राज्यशासन जनतेच्या पाठीशी असून अवेळी पावसाने झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी दु:खी होऊ नये, त्यांना निश्चितपणे नुकसान भरपाई देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. भारत सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांचे लाभ वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्यावतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. अनेक शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत, वंचित व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा उद्देश हा विकसित भारत संकल्प यात्रेचा आहे. ग्रामीण/शहरी/नगरपालिकास्तरावर लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा या यात्रेचा हेतू आहे, असे त्यांनी सांगितले.
-*-*-*-*-*-