ठाणे, दि.30(जिमाका) :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता आपल्याला मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत विकसित राष्ट्र निश्चित बनणार, यामध्ये कुठलीही शंका नाही. या देशातील युवकांनासुध्दा हे मान्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज कल्याण येथे केले.
“विकसित भारत संकल्प यात्रा” या उपक्रमाच्या पार्शवभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्यप्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधत असताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील कोलम बस स्टॉप शेजारी, कल्याण- मुरबाड रोड, गोवेली, या ठिकाणी उपस्थित होते, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मुरबाडचे आमदार किसन कथोरे, अपर जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जायभाये-धुळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदिया, कल्याण प्रांताधिकारी विश्वास गुजर, रामदास दौंड, जिल्हा कृषी अधीक्षक दिपक कुटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, कल्याण तहसिलदार जयराज देशमुख, गटविकास अधिकारी अशोक भवारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत मासाळ, कोलमचे सरपंच राजेश भोईर, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, इतर विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, बचतगटाच्या महिला, शालेय विद्यार्थी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी मागच्या 10 वर्षांमध्ये देशाची तसबीर व तकदीर बदलली आहे. हा देश एक विकसित देश, विकसित राष्ट्र म्हणून पुढे येतोय. देशाचा सन्मान संपूर्ण जगभरामध्ये उंचावलेला आहे आणि आज श्री. मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेत जवळजवळ 3 हजार खेड्यांमध्ये श्री. मोदी यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी जी गोष्ट सांगितली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. भारत देशाची 140 कोटी जनता हा माझा परिवार आहे आणि मला कोणतीही जात नाही, जात जर म्हणत असाल तर माझी जात युवा, माझी जात महिला, माझी जात किसान, माझी जात गरिबी आहे, हे सांगितल्यामुळे संपूर्ण देशातील गरिबी हटवणार, जोपर्यंत या देशातील नागरिक सुखी, समृध्द होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि मी थकणार नाही, असा संकल्पच त्यांनी केला आहे.
ते म्हणाले, या विकसित भारत संकल्प यात्रेच्या 3 मुख्य गोष्टी आहेत. एक वेगवेगळ्या केंद्रातील योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचविणे, दोन ज्यांना योजना पोहोचल्या आहेत त्यांच्या जीवनात काय परिणाम झाला आहे, हे तपासणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वांना बरोबर घेवून जनचळवळ उभी करणे, या चळवळीच्या माध्यमातून गोरगरीब, शेतकरी, युवा, महिला यांचा विकास कसा होईल, यासाठी प्रयत्न करणे, हा विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश आहे.
प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी काही दिवसांपूर्वी “माय भारत” अशी एक संकल्पना मांडली आहे. त्यामध्ये युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम सुरु आहे. भारत देश हा युवा देश आहे. 140 कोटी जनतेपैकी 65 टक्के जनता ही वय वर्ष 35 वर्षांखालची आहे. आणि युवा म्हटले की, नवीन उमेद, नवीन इच्छा, नवीन कार्यपध्दती. कोणतेही आव्हान स्विकारण्याची ताकद युवांमध्ये असते, म्हणूनच भारताचे भवितव्य खूपच चांगले आहे. भारताचा विकास होत आहे, आणखी विकास होणार आहे. आदिवासी भाग, झोपडपट्टी भाग, शहरी-ग्रामीण भाग, अशा सर्व ठिकाणी या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गरजू लाभार्थ्यापर्यत पोहोचण्याचे काम सुरु आहे, असे सांगून डॉ. कराड यांनी नागरिकांना आवाहन केले की, आपण या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सामील व्हावे आणि आपण आपल्याबरोबर जनचळवळ उभी करुन भारताचा विकास कसा होईल, त्यासाठी प्रयत्न करावा.
यावेळी डॉ.कराड यांच्या हस्ते कल्याण तालुक्यातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व विविध योजनांचे कार्ड वाटप करण्यात आले. तर आमदार किसन कथोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना अशा संकल्प यात्रेतील आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान श्री. मोदी यांचे आभार मानले व या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ निश्चित मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना छायादेवी शिसोदिया म्हणाल्या, विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात भिवंडी तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायत येथून झाली आहे. ज्या लाभार्थ्यांना आजपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांना तो लाभ मिळवून देणे, विविध शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार करणे, असा उद्देश असून तालुक्यातील 46 ग्रामपंचायतींमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये बचतगटांचे उत्पन्न 1 लाखापर्यंत नेण्याचा निश्चय केला आहे.
यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्य अभियान राबविले जात असून, अद्यापपर्यंत ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या 17 महत्त्वाकांक्षी योजनांची सविस्तर माहिती असलेल्या चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील ग्राम व तालुकास्तरावर व्यापक प्रचार-प्रसिद्धी केली जात आहे. तसेच नागरिकांकडून निवेदनही स्वीकारले जात आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांनी केंद्र शासनाच्या विविध योजना लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमानिमित्त विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना झालेल्या लाभाबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आयुष्मान भारत गोल्ड कार्ड व जलजीवन मिशनचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणीसह विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. नागरिकांनी या स्टॉल्सला भेटी देऊन आरोग्य तपासणीसह विविध योजनांचा लाभ घेतला. यावेळी सर्वांना मा.पंतप्रधान श्री. मोदी यांचा विकसित भारत बनविण्याचा संकल्प संदेश ऐकविण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संकल्प शपथ घेतली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे केंद्र शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांच्या लाभाविषयी अनुभव जाणून घेतले. योजनांची माहिती प्रत्येक वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी यावेळी केले. फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशात प्रचार व प्रसिद्धी करीत आहे. या यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकांनी शासनाच्या योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रधानमंत्री यांनी केले.
0000000000