सातारा दि. 1 :- मातोश्री पाणंद रस्ते योजनेतील कामे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन करणार नाही, या कामांमध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर तात्काळ मार्ग काढून कामे त्वरीत मार्गी लावावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाटण तालुक्यातील मंजूर सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक कामे, मातोश्री ग्राम समृध्दी शेत / पाणंद रस्ते योजनेतील कामांचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विजया यादव, जिल्हा नियोजन शशिकांत माळी, प्रातांधिकारी सुनिल गाडे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक आणि पाणंद रस्ते आदी विषयांचा आढावा घेतला. यामध्ये पाटण तालुक्यात सन 2021-22 मध्ये शासनाकडून सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉकची 44 कामे मंजूर आहेत. यामध्ये 4 कामे सुरु असून 38 कामे पूर्ण आहेत. 2 कामे अद्यापही सुरु झाली नाहीत. सन 2022-23 मध्ये 69 कामे मंजूर असून अद्यापही कामे सुरु झालेली नाहीत. मातोश्री ग्राम समृध्दी शेती/पाणंद रस्ते अंतर्गत 2021-22 मध्ये 21 कामे मंजूर असून 9 कामे सुरु आहेत. तर सन 2022-23 मध्ये शासनाकडून 75 कामे मंजूर असून यातील 19 कामे सुरु आहेत. या सर्व बाबींचा बैठकीत सविस्तर आढावा घेवून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सदर योजनांमधील प्रलंबित असणारी कामे तात्काळ मार्गी लावावीत, गावांतील अस्वच्छता पूर्णत: नष्ट करुन सिमेंट काँक्रीटकरण रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करा, असेही त्यांनी यावेळी निर्देशित केले.