नागपूर, दि. २ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन दिवसांच्या नागपूर भेटीनंतर भारतीय वायुसेनेच्या विमानाने शनिवारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीकडे प्रस्थान केले.
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षान्त समारंभात राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
राष्ट्रपती शुक्रवारी रात्री नागपूर राजभवन येथे मुक्कामी होत्या. शनिवारी सकाळी सुरेश भट सभागृहामध्ये विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ आटोपल्यानंतर राष्ट्रपती महोदया नागपूर विमानतळावर पोहोचल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअर मार्शल विवेक गर्क, ब्रिगेडिअर राहुल दत्त, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी उपस्थित होते.
राष्ट्रपती महोदयांच्या प्रस्थानानंतर दुपारी पावणेदोनच्या सुमारास राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईकडे प्रस्थान केले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला.