पिंपरी चिंचवड प्राणी संग्रहालयातील 36 प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर, दि. 12 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील 36 प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत जाहीर केला. हे प्राणी संग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहेत.
यासंदर्भात सदस्या श्रीमती अश्विनी जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
या प्राणी संग्रहालयाच्या नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार काम करण्यासाठी 2017 पासून प्राणी संग्रहालय बंद आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे काही कामे करावयाची असल्याने प्राणी संग्रहालय खुले करण्यात आलेले नाही.
दरम्यान, 2017 ते सन 2023 या कालावधीत एकूण 36 प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. सदर प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक असून औंध येथील शासकीय रूग्णालयामार्फत शवविच्छेदन करून प्राधिकरणाला महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आलेले आहे. 36 प्राण्यांचा मृत्यू ही गंभीर बाब असून त्याची प्रधान सचिव नगरविकास यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
राज्याच्या वन विकास महामंडळाकडे महापालिकेने हे प्राणी संग्रहालय हस्तांतरीत करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला.
—————————————————————————-
रस्ते अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी
राज्यात १७ ठिकाणी ‘स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर,दि.12 : रस्ते अपघात रोखण्यासाठी असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून त्याचे दृष्यस्वरूपात बदल दिसून येतील, अशी ग्वाही देतानाच राज्यात 17 ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग, 23 ठिकाणी स्वयंचलित वाहनयोग्यता प्रमाणपत्र केंद्र उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य अशोक चव्हाण यांनी राज्यात होत असलेल्या वाहन अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गावर वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आतापर्यत किमान 60 ते 70 लाख वाहनांनी प्रवास केला असून समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक दहा किमी अंतरावर रम्बलर बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
वाहन चालक परवाना स्वयंचलित पद्धतीने देण्यासाठी राज्यात 17 ठिकाणी ऑटोमॅटीक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उपलब्ध करून देण्यात येत असून त्यासंदर्भात त्याची कार्यवाही सुरू आहे. ट्रॅकसाठी दोन महिन्यात कार्यादेश देण्यात येईल. 23 ठिकाणी ऑटोमॅटीक फिटनेस सेंटर्सदेखील करण्यात येत असून वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वी संबंधितांना पूर्वकल्पना देण्याबाबत यंत्रणा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्रीमती वर्षा गायकवाड, देवयानी फरांदे यांनी भाग घेतला.
——————————————————————————-
भिवंडी निजामपूर मनपातील प्रभारी सहायक आयुक्तांच्या विभागीय चौकशीचा अहवाल १५ दिवसात मागविणार- मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. १२ : भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील प्रभारी सहायक आयुक्तांची विभागीय चौकशी सुरू असून त्याचा अहवाल १५ दिवसांच्या आत मागविण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य नीलेश लंके यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. मंत्री श्री. सामंत म्हणाले, सोमनाथ सोष्टे यांना प्रभारी सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती क्र.५ या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला असताना नाले व गटार सफाई करण्याकरिता मजुरांचे वेतन देण्याकरिता त्यांनी घेतलेल्या अग्रिमाचा ताळमेळ सादर केलेला नाही. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यास महानगरपालिकेमार्फत दिलेल्या नोटिसीचा खुलासा प्राप्त न झाल्यामुळे त्यांच्या मासिक वेतनातून दरमहा रक्कम कपात करण्याच्या महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशास अनुसरून कार्यवाही सुरू आहे.
यावेळी सदस्य रईस शेख, प्रशांत बंब, योगेश सागर यांनी उपप्रश्न विचारले.
000
श्री. दीपक चव्हाण/विसंअ/
———————————————————————————
यवतमाळ नगरपरिषदेतील घनकचरा व्यवस्थापन निविदाप्रकरणी विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालानुसार कारवाई करणार– मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. १२ : यवतमाळ नगरपरिषदेत घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रकरणाबाबत विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालावर 15 दिवसांत कारवाई करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
यवतमाळ नगरपरिषदेत घनकचरा व्यवस्थापनासाठी गैरपद्धतीने डी एम एंटरप्राइजेस कंपनीस पात्र ठरविल्याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, नगरपरिषदेतील घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रकरणाचा विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार जे दोषी आढळले असतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. विभागीय आयुक्त यांच्या चौकशी अहवालानुसार १५ दिवसांत कारवाई करण्यात येईल.
यावेळी सदस्य यशोमती ठाकूर यांनी उपप्रश्न उपस्थित करून चर्चेत सहभाग घेतला.
000
श्री. पवन राठोड/ससं/
—————————————————————————–
अंबाजोगाई नगरपरिषद कर्मचारी वेतनप्रकरणी अनियमिततेवर चौकशी अहवालानंतर कारवाई- मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. १२ : नगरपरिषद अंबाजोगाई (जि. बीड) येथील कर्मचाऱ्यांचे वेतन अंबाजोगाई पिपल्स नागरी सहकारी बँकेतून अदा करण्याप्रकरणी जिल्हाधिकारी, बीड यांच्यामार्फत चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर काही अनियमितता झाली असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य श्रीमती नमिता मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, नगरपरिषदेचे सहाय्यक अनुदानासाठी राष्ट्रीयकृत बँकेमधील खाते आहे. या खात्यात अनुदान मिळते. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून देण्याबाबत नियम आहे. हा नियम होण्यापूर्वी अंबाजोगाई पीपल्स नागरी सहकारी बँकेतील खात्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन मिळत होते. मात्र २० मे २०२१ रोजी पुन्हा वेतन खाती सहकारी बँकांमध्ये असल्यास वेतनाची अदायगी त्याच खात्यात करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. शासनाची खाती पुन्हा सहकारी बँक, पतसंस्था याकडे देण्याबाबत सदर वित्तीय संस्थेची पूर्ण आर्थिक परिस्थिती बघूनच निर्णय घेण्यात येतो.
या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य अशोक चव्हाण यांनी भाग घेतला.
0000
श्री. नीलेश तायडे/विसंअ/