विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
7

ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठातांची चौकशी सुरु– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १२ : पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालय येथील ड्रग्ज प्रकरणी रुग्णालयाच्या अधिष्ठातांची चौकशी सुरू असून चौकशीत पुरावे असतील तर बडतर्फाची कारवाई करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषदेत पुणे येथील ससून रुग्णालयाच्या गेटवरून कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केल्याबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थ तस्करी प्रकरणी तपासात ससून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी व पोलीस अधिकारी यांचा तस्करीत सहभाग असल्याचे अद्यापपर्यंत निष्पन्न झालेले नाही. आरोपीच्या संरक्षण कामी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याने दोन पोलीस अधिकारी व दोन कर्मचारी यांना बडतर्फ केले असून सहा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.

ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कैद्याकडून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालवले जात असल्याचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला असून ससून रुग्णालयाच्या गेटवरून २ कोटी १४ लाखांचे मेफेड्रॉन हा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. अशा प्रकारच्या कारवाया राज्यात करण्यात येत आहेत. त्यामध्ये विविध घटना उघडकीस येत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील काही भागात बंद असलेल्या कंपन्यांमध्ये ड्रग्ज तयार करण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे संशयित हालचाली होत असलेल्या राज्यातील बंद कारखान्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पुणे अधिष्ठाता डॉ. ठाकूर  यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ललित पाटील विविध व्याधीने ग्रस्त होता. त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका अशा स्वरूपाची धमकी ससूनचे अधिष्ठाता यांनी तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना दिल्याची तक्रार आली नसल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

श्री. फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थ तस्करी हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असून याचे पुरावेही सापडले आहेत. इतर राज्याच्या समन्वयाने कारवाई करण्यात येत आहे. हुक्का पार्लर बंद करण्यात आले आहेत. संशयास्पद व्यक्ती व आरोपींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. नार्को टेस्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

सर्व सदस्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या प्रकरणातील कोणासही पाठिशी घातले जाणार नाही. भावी पिढीचे भवितव्य महत्त्वाचे असल्याने सरकार ही लढाई लढत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले.

या प्रश्नांच्या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री सचिन अहीर, भाई जगताप, राजहंस सिंह, अनिल परब,  अरुण लाड यांनी सहभाग घेतला.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

————————————————————————–

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केलेल्यांवर तपासून कारवाई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 12 : नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला असूनही याप्रकरणी जाणीवपूर्वक कारवाई झाली नसेल, तर तपासून कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांची फसवणूक प्रकरणाविषयी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

नंदुरबार जिल्ह्यात सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या 51 शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना कोणतेही साहित्य न देता त्यांची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यातील पाचही आरोपींना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. याविषयी अधिक माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अनिल परब यांनी सहभाग घेतला.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

————————————————————————–

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात भाडेतत्त्वावर वसतिगृह घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, दि. 12 : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शासनाने निर्णय घेतल्याप्रमाणे सर्व जिल्ह्यात वसतिगृह बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. वसतिगृह बांधकामासाठी काही कालावधी लागणार असून या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरुपात भाडेतत्वावर वसतिगृह घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळण्यासंदर्भात सदस्य रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, सारथी, महाज्योतीमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निधीत फरक होता. तो समान करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विविध शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आवश्यकतेनुसार वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील ‘छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृह’ योजनेअंतर्गत खासगी नोंदणीकृत संस्थांचे वसतिगृह चालवण्यास तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेशी संलग्नित करून या योजना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून अंमलात आणण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार खासगी वसतिगृह सुरू करण्यासाठी इच्छुक नोंदणीकृत संस्थेची निवड करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून करण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.

सारथी संस्थेमध्ये स्पर्धा परीक्षा, संशोधन, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी, सामाजिक न्याय, सांख्यिकी असे विभाग कार्यान्वित असून सन २०२२-२३ या वर्षामध्ये स्पर्धा परीक्षा विभागाच्या केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, संशोधन विभागातील पीएचडी, एम.फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य तसेच शिक्षण विभागाकडील छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती इतक्या योजना कार्यान्वित होत्या. या योजनांवर ऑक्टोबर, २०२३ अखेर सुमारे १३०.८३ कोटी इतका खर्च झाला असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

सन २०२३-२४ आर्थिक वर्षात स्पर्धा परीक्षा अंतर्गत युपीएससी, नेट, सेट, आयबीपीएस यासाठी आर्थिक सहाय्य, संशोधन विभागाच्या पीएच.डी., एम.फिल करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांना आर्थिक सहाय्य, कृषी विभागाच्या आयएफएटी, डब्ल्यूबीएटी या कोर्सेस करीता आर्थिक सहाय्य, शिक्षण विभागाच्या राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती, निबंध स्पर्धा तसेच सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती तसेच परदेशी शिष्यवृत्ती अशा मोठ्या प्रमाणावर योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना या योजनांतून चालू आर्थिक वर्षात खर्च करण्यात येणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

या प्रश्नांच्या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम काळे, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here