संसदीय परंपरेत महाराष्ट्र विधिमंडळाचे उच्चस्थान- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

नागपूर, दि. १४ :  राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध निर्णय, कायदे, विधेयकांवर पक्ष विरहित वैचारिक चर्चा घडवून आणण्यात महाराष्ट्र विधीमंडळ हे संसदीय परंपरेत उच्चस्थानी आहे आणि ही परंपरा निर्माण करण्यात विधिमंडळाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.

‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परातील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ या विषयावर राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात मार्गदर्शन करताना श्री. दानवे बोलत होते. यावेळी विधानमंडळ सचिव श्री. विलास आठवले उपस्थित होते.

श्री. दानवे म्हणाले, द्विसभागृहामध्ये विधानपरिषद वरिष्ठ तर विधानसभा कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते. दोन्ही सभागृहे एकमेकास पूरक असून विधिमंडळात वरिष्ठ सभागृहाला महत्वाचे स्थान आहे. कनिष्ठ सभागृह नेहमीच वरिष्ठ सभागृहाचा सन्मान ठेवते. कनिष्ठ सभागृहाने घेतलेल्या निर्णयावर या सभागृहात चिकित्सक पद्धतीने चर्चा घडवून आणली जाते. एखाद्या विधेयकांवर, कायद्यांमध्ये वरिष्ठ सभागृह बदल सुचवून ते पुन्हा कनिष्ठ सभागृहाकडे पाठवते. कनिष्ठ सभागृह याचा आदर करून याबाबत सकारात्मक प्रतिसाद देते. यातूनच द्विसभागृह पद्धतीचे महत्व अधोरेखित होते.

द्विसभागृहाचे वैशिष्ट्य सांगताना श्री. दानवे म्हणाले, दोन्ही सभागृहात सत्ताधारी व विरोधकांचे बहुमत कमी-अधिक असले तरी येथे कोणाचे व्यक्तिगत मतभेद नसतात. दोन्ही सभागृहातील सदस्य जनतेच्या समस्या सभागृहात मांडत असतात. विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात समन्वयाने काम करुन जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात.

राष्ट्रकुल संसदीय मंडळाने अभ्यास वर्गाच्या माध्यमातून, ‘राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन’ या  विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विधिमंडळाचे कामकाज समजून घेण्याची संधी दिली आहे.  विद्यार्थ्यांनीही या संधीचे सोने करावे, अशी अपेक्षा श्री. दानवे यांनी व्यक्त केली.  राज्य, देशाचे भवितव्य तरुणांच्या खांद्यावर असून युवा पिढी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने लोकशाहीच्या बळकटीकरणास तरुणांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा परिचय करून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनी मोहिनी वानखडे हिने आभार मानले.

००००

श्री. एकनाथ पोवार / ससं/