नागपूर, दि. 15 : जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग आणि रंग असा कोणताही भेद न पाळता संविधानाने सर्व अधिकार लोकांना दिले आहेत. त्यामुळे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष भारत घडवण्यात तरुणांनी पुढाकार घेऊन याकामी स्वतःला झोकून देऊन काम करावे, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात ‘संसदीय लोकशाहीत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि विधिमंडळातील भूमिका’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, विधानमंडळ सचिव विलास आठवले उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात मोठी ताकद आहे. संविधानाने देशातल्या प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दिले आहे. विविधतेने नटलेली लोकशाही टिकवण्यात व सार्वभौम भारत घडवण्यात तरुणांचे योगदान मोलाचे असल्याचे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.
संसदीय लोकशाहीत संविधानाने दिलेल्या तत्वानुसार जनहिताचे निर्णय घेणे हे सत्ताधारी पक्षाचे काम आहे. तर कायदे, नियमानुसार सत्ताधारी पक्षाची कामे होतात की नाही ही पाहण्याची जबाबदारी विरोधी पक्षाची आहे. प्रत्येकाला वेगळा विचार मांडण्याची संधी संविधानाने दिली असून सत्ताधाऱ्यांनी मानवतावादी विचार जिवंत ठेवण्याची भूमिका पार पाडणे जरुरीचे आहे. अशा सर्व बाबींमध्ये सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम विरोधी पक्षाचे असून संसदीय लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षाइतकीच महत्वाची असल्याचे श्री. वडेट्टीवार म्हणाले.
ब्रिटनचे पंतप्रधान विस्टन चर्चिल म्हणाले होते, भारतात लोकशाही टिकणार नाही. तथापि आजही आपल्या देशातील विविधतेने नटलेली लोकशाही लोकांनी जपली आहे. यापुढेही संविधानाचे रक्षण करणे हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांची महत्वपूर्ण जबाबदारी असून यामध्ये नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. संसद, विधीमंडळ ही लोकांचे प्रतिनिधित्व करणारी लोकशाहीची मंदिरे आहेत. राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गाच्या माध्यमातून संसदीय लोकशाहीचे मूल्य शिकवण्याचे काम होत आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाने आपल्याला विचार मांडण्याची, विधिमंडळाचे कामकाज जाणून घेण्याची संधी दिली आहे. त्यामुळे या अभ्यास वर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासूवृत्तीने सामाजिक, राजकीय कार्यात पुढे येऊन लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून द्यावा. आज तरुण समाज माध्यमांना बळी पडत असून तरुणांनी समाज माध्यमांचा चांगल्या कामासाठी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा परिचय करून दिला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी वैभव सारवे याने आभार मानले.
०००००
श्री. एकनाथ पोवार/ससं/