नागपूर दि. 18 : गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाची गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार कामे करण्याच्या सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.
गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलात सुविधा निर्माण करणे आणि युएनडीपी अंतर्गत शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासंदर्भात विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अमित साटम, आमदार डॉ. देवराव होळी, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, उपसचिव सुनील हांजे, उपसंचालक शेखर पाटील, सुहास पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता नीता ठाकरे व जिल्हा क्रीडा अधिकारी उपस्थित होते.
भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत फुटबॉल स्पर्धेचे आयोजन मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी मार्फत दरवर्षी दिल्ली येथे आयोजित होते. यामध्ये राज्यस्तरावर विजयी झालेला संघ सहभागी होतो. त्यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. हे आयोजन 14, 17 व 19 वर्षाखालील गटात करण्यात येते. यामधून जिंकलेला संघ दिल्लीला राष्ट्रीयस्तरावर खेळण्यासाठी निवडला जातो. त्यासाठी मुलींच्या जिल्हास्तरावर फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनास तत्वतः मान्यता देण्यात आल्याचे क्रीडा मंत्री श्री. संजय बनसोडे यांनी सांगितले.
गडचिरोली सारख्या आदिवासी भागातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा क्रीडा संकुलामध्ये विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. प्रशासकीय इमारत, व्यायाम शाळा बांधकाम, इनडोर बॅडमिंटन हॉल व डोम टाईप मल्टीगेम इनडोर हॉलची कामे सुरू आहेत. ही कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचनाही क्रीडामंत्री श्री. बनसोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
00000