विधानसभा कामकाज 

0
5

अमरावती, जालना येथील घटनेप्रकरणी संबंधितांना अटक -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १८: अमरावती येथे मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा सापडल्याप्रकरणी आणि जालना येथे घडलेल्या गोळीबार घटनेप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केले.

विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित केलेल्या मुद्दाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला. याप्रकरणी दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 75 हजार 500 रुपये किंमतीचा शस्त्र साठा जप्त केला आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीच्या घराच्या झडती दरम्यानही शस्त्र साठा सापडल्याने आर्म ॲक्टसह विविध गुन्हे संबंधितांवर दाखल करण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

जालन्यात गजानन तौर या व्यक्तीवर झालेल्या झालेला गोळीबार प्रकरणीही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निवेदन केले. याप्रकरणातील संबंधित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

०००

सोलार इंडस्ट्रीज इंडिया मधील स्फोट प्रकरणी फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १८: काटोल तालुक्यातील चाकडोह, बाजारगांव येथील सोलार इंडस्ट्रीज इंडिया कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणी कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी फॉरेन्सिक विभागाचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणी अंतिम निर्णय घेतला जाईल, असे निवेदन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, सोलार इंडस्ट्रीज इंडिया या कारखान्यात दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी स्फोटाची घटना घडली होती. या कारखान्यात संरक्षण विभागाकरिता लागणाऱ्या विस्फोटकांचे उत्पादन केले जाते. कारखान्यातील कामगारांची संख्या सुमारे ३४०० असुन कारखान्यातील कामगारांना किमान वेतनाबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. कारखान्यातील कास्टींग प्रोसेस हाऊस नंबर २ या इमारतीत टी. एन.टी. आणि आर. डी.एक्स. या कच्च्या मालाचा वापर करुन हॅन्ड ग्रेनेड बनविण्यासाठी लागणाऱ्या पेलेटसची निर्मिती केली जाते. दिनांक १७ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान कारखान्यातील कास्टींग प्रोसेस हाऊस नंबर २ मध्ये नेहमी प्रमाणे काम सुरु करण्यात आले होते. या  ठिकाणी टी.एन.टी. फ्लेक्स चाळणीमध्ये चाळत (Sieving) असतांना सकाळी  ९ वाजता ही स्फोटाची घटना घडली. त्यामुळे कास्टींग प्रोसेस हाऊस नंबर २ ही इमारत कोसळून त्या ठिकाणी काम करणाऱ्या एकूण ९ कामगारांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की,  मृतांमध्ये ६ महिला कामगारांचा व ३ पुरुष कामगारांचा समावेश  आहे.  घटना घडल्यानंतर याठिकाणी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली असून पुढील चौकशी करण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे घटनास्थळी राज्य आपत्ती निवारण दल ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह काढण्याचे काम करत आहे.

मृत कामगारांपैकी ८ कामगार हे कामगार राज्य विमा योजनेत नोंदणीकृत असल्याने त्यांना कामगार राज्य विमा योजना कार्यालयाकडून नियमानुसार पेन्शन मिळणार आहे. तसेच उर्वरित १ मृत कामगाराच्या वारसाना नुकसान भरपाई कायदा,१९२३ अन्वये नुकसान भरपाई मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कंपनीच्या व्यवस्थापनाने मृत कामगारांच्या वारसास प्रत्येकी रुपये २० लाख सानुग्रह अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी रु.५ लाख देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले असल्याची माहितीही या निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here