मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई दि.२१ :  राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने १ ऑगस्ट ते ५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करून घेण्याच्या उद्देषाने या स्पर्धेत जाहिरातनिर्मिती, भित्तिपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य लेखन या  तीन गटात  स्पर्धकांनी सहभाग घेतला.

यामध्ये जाहिरातनिर्मिती स्पर्धेसाठी ६९, भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेसाठी ६३८ आणि घोषवाक्य लेखन स्पर्धेसाठी ३५७ प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यातुन प्रत्येक स्पर्धेसाठीच्या परीक्षकांनी या प्रवेशिकांचे परीक्षण करून मुल्यांकन केले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आगामी राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच येत्या २४ जानेवारी २०२४ रोजी नियोजित आहे. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांसोबतच, स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला सहभागाचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. सोहळ्याचे ठिकाण आणि वेळ लवकरच जाहिर करुन सर्व विजेते आणि सहभागी स्पर्धकांना कळवले जाईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळवण्यात आले आहे. स्पर्धेचा निकाल असा आहे.

जाहिरातनिर्मिती स्पर्धा

जाहिरातनिर्मिती स्पर्धेत प्रथम पारितोषिक कुणाल कोळी (जे.के अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाइन) यांना तर निशा उपाध्याय (गुरु नानक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय) यांना द्वितीय पारितोषिक मिळाले.  शुभम फाळके (जे.के कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन) तृतीय पारितोषिकाचे मानकरी ठरले आहे‌.

यासोबतच वेदांती आखाडे (जे.के अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाइन) आणि तेजस साळगावकर (बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट – अप्लाईड आर्ट) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेसाठी प्रकाश कुंटे आणि विकास पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. जाहिरातनिर्मिती स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. १ लक्ष, ७५ हजार, आणि रु. ५० हजार तसेच सन्मानचिन्ह, तर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी रु. १० हजारचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धा

भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेत प्रथम पारितोषिक  दया गुजर (मंथन आर्ट स्कुल) यांनी मिळवले असून  आकांक्षा किरण मर्दे (सोफिया पॉलिटेक्निक) यांना द्वितीय पारितोषिक आणि अभिषेक ठाकरे (मंथन आर्ट स्कूल) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. यासोबतच संयुक्ता पवार (जे.के अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाइन) आणि धनश्री भागडकर (सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेसाठी संदीप सावंत आणि डॉ. संतोष पाठारे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. ५० हजार, रु. २५ हजार आणि रु. १० हजार तसेच सन्मानचिन्ह, तर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी रु. ५ हजारचे पारितोषिक देऊन गौरवले जाईल.

घोषवाक्य लेखन स्पर्धा

घोषवाक्य लेखन स्पर्धेत  प्रथम पारितोषिक साहिल कासारे (संवाद आणि पत्रकारिता विभाग, मुंबई विद्यापीठ, कलिना, सांताक्रूझ) यांना  जाहीर झाले असून वैष्णवी धुरी (बी.एस. बांदेकर ललित कला महाविद्यालय) यांना द्वितीय पारितोषिक आणि अवेदिका रहिंज (सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. यासोबतच समृद्धी पाटील (सोफिया- श्री बी.के. सोमानी मेमोरियल पॉलिटेक्निक), साक्षी चक्रदेव (मंथन- द स्कूल ऑफ क्रिएटिव्ह अॅडव्हर्टायझिंग अँड आर्ट) आणि आदिती पोसणे (बी.एस.बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स, सावंतवाडी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेसाठी डॉ. निर्मोही फडके आणि प्रा. अभिजित देशपांडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. घोषवाक्य लेखन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. २५ हजार, रु. १५ हजार आणि रु. १० हजार तसेच सन्मानचिन्ह, तर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी रु. ५ हजारचे पारितोषिक देऊन गौरवले जाईल.

या स्पर्धेत सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्व विजेते आणि स्पर्धकांचे निवडणूक कार्यालयाने अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.

000000

वंदना थोरात/वि.सं.अ.