विकसित भारत संकल्प यात्रेची नियोजनबध्द अंमलबजावणी करा – केंद्रीय सहसचिव अनिता शाह अकेला

कोल्हापूर, दि. 22 : विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश हा आत्तापर्यंत लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांना लाभ वितरित करणे हा आहे. यासाठी गावस्तरावर जनजागृती करीत संकल्प यात्रा गावोगावी जात आहे. या यात्रेची नियोजनबध्द अंमलबजावणी करा अशा सूचना केंद्रीय सहसचिव अनीता शाह अकेला यांनी जिल्हास्तावरील विभाग प्रमुखांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांना जिल्ह्यातील संकल्प यात्रेचे सादरीकरण जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांचेसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी सहसचिव अकेला यांनी आयुष्यमान भारत कार्ड वाटपाबाबत केलेल्या जिल्ह्यातील कामाची प्रसंशा केली. बँक आधारित कर्ज पुरवठा योजनांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करा, कृषी विभागाकडील योजना शेतकऱ्यांना सांगा, गावस्तरावर सर्वे चांगले करा आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

नागाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेला भेट

शासकीय योजनांचे लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी जिल्हयात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन शासनाकडून करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून केंद्रीय सहसचिव अनीता शाह अकेला यांची नियुक्ती झाली आहे, त्यांनी नागाव कोल्हापूर येथे सुरू असलेल्या संकल्प यात्रेला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते प्रसिध्दी रथाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. नागाव येथील आयोजित कार्यक्रमात पात्र लाभार्थ्यांना सहसचिव अकेला यांचे हस्ते विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकरी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, सरपंच विमल शिंदे, उपविभगीय अधिकारी मौसमी चौगुले, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, तहसिलदार कल्पना ढवळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, महिला बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, गट विकास अधिकारी शबनम मोकाशी, उपसरपंच सुधीर पाटील, संजय पाटील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संकल्प यात्रेतील योजनांची माहिती आत्मसात करून त्याचा फायदा घेण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले. उर्वरीत पात्र लाभार्थी यांनी या संधीचा लाभ घेवून संकल्प यात्रेचा उद्देश यशस्वी करावा, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करा असेही त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी, नागरिक, युवा, स्थानिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेवून विकसित भारतासाठी योगदान द्यावे असे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी आयुष्यमान कार्डचे महत्त्व सांगून ते काढण्याचे आवाहन उपस्थितांना केले. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान तसेच घन कचरा व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना राबिण्यासाठी जिल्हा परिषद सदैव आपल्या पाठीशी राहील असे आश्वासन त्यांनी नागाव येथे दिले. सरपंच विमल शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मान्यवरांचे स्वागत व आभार मानले. कार्यक्रमानंतर कृषी विभागाकडून ड्रोनचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

000