सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून कंपन्यांनी नाशिकचा चेहरा बदलण्यासाठी हातभार लावा : पालकमंत्री दादाजी भुसे

0
8

नाशिक, दि. 22 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): क्वालिटी सिटीमध्ये नाशिकची झालेली निवड व आगामी सिंहस्थ कुंभमेळा या बाबी लक्षात घेवून सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून कंपन्यांनी नाशिकचा चेहरा बदलण्यासाठी हातभार लावावा. त्याचप्रमाणे शहराच्या सुशोभिकरणासाठी नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सामाजिक दायित्‍व निधी (सीएसआर) बाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री भुसे बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, मालेगाव महानगपालिका आयुक्त राजेंद्र जाधव, नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, नाशिक एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, नाशिक महानगरपालिका समाज कल्याण उपायुक्त प्रशांत पाटील, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, नाशिक महानगरपालिका सीएसआर प्रमुख विशाल तांबोळी, निमा अध्यक्ष धनंजय बेळे, निमा सचिव राजेंद्र अहिरे, आयमा अध्यक्ष निखील पांचाळ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे संजय सोनवणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री  दादाजी भुसे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना होणाऱ्या नफ्याच्या प्रमाणात सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कामे केली जातात. या कामांमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहराच्या सौंदर्यीकरणासाठी विविध पायाभूत सुविधा सीएसआर च्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यास शहर सुशोभिकरणास मदत होणार आहे. यासोबतच शहरातील महत्वाच्या रस्त्यांच्या कडेला अनेक वर्षांपासून बंद पडलेली वाहने ज्या वाहन मालकांची असतील ती त्यांनी लवकरात लवकर हटविण्याचे आवाहन देखील पालकमंत्री श्री. भुसे यांनी केले आहे. या बैठकीच्या दरम्यान औद्योगिक कंपन्यांच्या पदाधिकारी यांना सीएसआर मध्ये कामे करतांना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करून काही विधायक सूचना ही  पालकमंत्री श्री. भुसे यांच्या समोर मांडल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here