उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची तरंग उत्सवाला भेट

0
8

पुणे, दि.२३ – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आयोजित तरंग उत्सवाला भेट दिली. हा उत्सव खऱ्या अर्थाने ‘मैत्रीचा उत्सव’ असून पोलीस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करणारा असल्याने नागरिकांनी उत्सवात आवर्जून सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री.पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त संदीप गिल आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील यांनी उत्सवातील विविध दालनांना भेट दिली आणि दहशतवाद विरोधी पथकाचे प्रात्यक्षिक पाहिले. ते म्हणाले, या उत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कला, संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासोबत पोलीस दलाविषयी माहितीदेखील मिळते. पोलीस हा आपला खऱ्या अर्थाने मित्र आहे ही भावना दृढ होऊन परस्पर सहकार्याला चालना मिळते. यातूनच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. नागरिकांनी आवर्जून या उत्सवात सहभागी होत सुट्टीच्या दिवसाचा आनंद घ्यावा आणि पोलीस दलाविषयी जाणून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

दामिनी पथकाचे कौतुक

मंत्री श्री.पाटील यांनी दामिनी दलविषयीच्या दालनाला भेट देऊन माहिती घेतली. या पथकाची कामगिरी मोलाची असून अशी पथके वाढविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. दुसऱ्या महायुद्धातील विविध शस्त्राविषयीदेखील त्यांनी जाणून घेतले. हा उपक्रम मनोरंजनासोबत लोकशिक्षण करणारा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

असा आहे ‘तरंग-२०२३’ उत्सव
पोलीस दलातील विविध शाखा, घटक यांची परिपूर्ण माहिती उत्सवात देण्यात आली आहे. ‘तरंग -२०२३’ कार्यक्रम २४ डिसेंबर पर्यंत सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुला राहणार आहे.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण हे पोलीस घटकांचे प्रदर्शन असून त्यामध्ये पोलीस दलातील विविध शाखा व त्या शाखांमधील चालणारे कामकाज याविषयी ऑडीयो, व्हिडीओच्या माध्यमांतुन माहिती सांगण्यात येत आहे.

सांस्कृतिक कलेचा वारसा असलेल्या पुणे शहरातील स्थानिक कलाकार यांची कलाकृती (आर्टिसन गॅलरी) या शिर्षकाखाली सर्व सामान्यांसाठी प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामध्ये पुण्यातील स्थानिक कलाकारांची मातीची भांडी कलाकृती, पर्यावरणपूरक प्लास्टिक पदार्थाचे पुर्नप्रकल्पाने तयार केलेल्या उपयोगी वस्तु, तांबे पितळ या भांड्याचे प्रदर्शन, फुलझाडे, रोपवाटीका यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

नविन पिढी, लहान बालके यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणुन विज्ञात प्रदर्शन, मुलांसाठी खेळप्रकार, व्हिडीओचे माध्यमांतुन लहान बालकांसाठी गुड टच, बॅड टच यासारखे प्रबोधनपर प्रदर्शन ‘किड्स झोन’ चे माध्यमांतुन प्रदर्शित करण्यात आले आहे. विविध मनोरंजनाचे कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात येत आहेत. खाद्य संस्कृतीचेही स्टॉल प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. भारतातील विविध कलाकुसर, खादी, दाग-दागिने, देशी पदार्थ, कपड्यांसह विविध वस्तू प्रदर्शनात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here