जिल्हा परिषद मॉडेल स्कूल खंडेराजुरीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण

सांगलीदि. 28 (जि. मा. का.) : जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल म्हणून घडविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ‍पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 171 व दुसऱ्या टप्प्यात 143 शाळांची निवड करण्यात आली. त्यामध्ये मिरज तालुक्यातील 35 शाळांचा समावेश आहे. याच माध्यमातून खंडेराजुरीच्या जिल्हा परिषद मॉडेल स्कूलची सुंदर व देखणी इमारत तयार झाली असून तिचे आज लोकार्पण होत आहे. यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होणार आहे. सांगली जिल्हा परिषदेचा मॉडेल स्कूलचा उपक्रम राज्य शासनाने अंगिकारला असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले.

मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा मॉडेल स्कूलच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सरपंचा शुभांगी चव्हाण, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, प्रभारी गट विकास विकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके, शिक्षण विस्तार अधिकारी एस. आर. चिकलकी व श्रीमती श्रद्धा कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना चव्हाण यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कंत्राटदार यांच्यासह विविध मान्यवर, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद मॉडेल स्कूल शाळा खंडेराजुरी या शाळेच्या 6 नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यासाठी 93 लाख 29 हजार एवढा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, खंडेराजुरी गावाच्या रस्ते, पाणी, तीर्थक्षेत्र विकास आदि विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून, यापुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही. ग्रामस्थांनीही गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पंधराव्या वित्त आयोगातून पंचायत समिती स्तर मिरज तालुक्यातील 36 शाळांना संगणक देण्यात येत असून, पहिला संगणक आज या शाळेला पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते वितरित करण्यात आला. तसेच, आरोग्य शिबिरामध्ये तपासणी केलेल्या गरजू रूग्णांना डॉ. खाडे यांच्याहस्ते प्रातिनिधीक चष्मा वाटप करण्यात आले.

यावेळी बँक ऑफ इंडिया मालगावचे शाखाधिकारी श्री. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. इंद्रजीत पाटील, किशोर कांबळे, सुरेश चौगुले, वास्कर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत श्री. स्वामी यांनी, प्रास्ताविक सुलोचना चव्हाण यांनी केले. प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत गायन केले. तद्‌नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले. आभार सुधीर आदर्से यांनी मानले.