सर्वांच्या सहकार्यातून सोलापूरचे १०० वे नाट्यसंमेलन देशभरात पथदर्शक ठरेल – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

सोलापूर, दिनांक 28 ( जिमाका):-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने राज्यातील सहा महसूली विभागात शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलने आयोजित केली जात आहेत. परंतु पुणे विभागात पिंपरी चिंचवड व सोलापूर येथे हे नाट्यसंमेलन आयोजित केले जाणार असून, सोलापूरचे नाट्य संमेलन दिनांक 20 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे. हे नाट्यसंमेलन 100 वे असल्याने सर्व सोलापूरकरांच्या सहकार्यातून दर्जेदार नाटकासह येथे येणाऱ्या सर्वांना उत्कृष्ट सोयी सुविधा देऊन संपूर्ण देशभरात आदर्शवत ठरेल असे संमेलन केले जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

नॉर्थ कोर्ट प्रशाला येथे शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलनाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री तथा नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, नाट्य व सिने अभिनेता भाऊ कदम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, माजी आमदार तथा संमेलनाचे कार्य अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, विजय साळुंखे, तेजस्विनी कदम, प्रशांत बडवे, मोहन डांगरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, सोलापूर येथे यापूर्वीही संमेलने झालेली आहेत त्यामुळे सोलापूरकरांना उत्कृष्ट नियोजनाचा चांगला अनुभव असल्याने हे शंभरावे नाट्यसंमेलन अशा पद्धतीने करावे की त्याची देशभरात दखल घेतली जाईल. यापुढे झालेली व पुढील काळात होणारी सर्व नाट्य संमेलनात सोलापूर येथे झालेल्या व येथे पाहुण्यांचे केलेले आदरतिथ्य व दिलेल्या सर्व सोयी सुविधा याची दखल नाट्यसंमेलनानी घेतली पाहिजे तसेच ते देश पातळीवर आदर्शवत ठरले पाहिजे यासाठी सर्वांच्या सहकार्यातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नॉर्थ कोर्ट प्रशालेच्या प्रांगणात दिनांक 20 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत 100 वे नाट्य संमेलन होणार असून, मराठी नाट्य परिषदेने या कालावधीत नाट्य कलावंत ,नाट्य रसिक यांच्या दृष्टीने कोणत्या प्रकारचे नाटक ठेवायचे तसेच त्यातील सारांश कसा असावा याची सर्व जबाबदारी घ्यावी. या नाट्य संमेलनासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही. तसेच हे संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रत्येक सोलापूरकरांनी सहकार्य करावे. संमेलनासाठी आपण स्वतः दोन लाख पन्नास हजार रुपयांचा धनादेश आज नाट्य परिषदेला देत असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ही नाट्य संमेलनासाठी निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले तसेच प्रत्येकाने या संमेलनासाठी सढळ हाताने निधी द्यावा, असे आवाहन ही त्यांनी केले.

मराठी नाट्य परिषदेने या संमेलनासाठी प्रख्यात सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांना आणण्याची जबाबदारी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्यावर सोपवलेली आहे. ती जबाबदारी शंभर टक्के पार पाडण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून या संमेलनासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महानायक अमिताभ बच्चन आणण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली.

सोलापूर येथील नाट्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. स्थानिक नाट्य कलाकारांनी ही यात सक्रिय सहभाग घ्यावा. सर्व नाट्यप्रेमी नागरिकांनी या संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन अभिनेते भाऊ कदम यांनी केले. हे संमेलन आपल्या घरीच होत आहे असे समजून प्रत्येक सोलापूरातील नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारी सर्वस्वी जबाबदारी पार पाडू अशी ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली. यापूर्वी सोलापूरकरांनी दोन नाट्य संमेलने व एक बाल नाट्य संमेलन यशस्वीपणे पार पाडलेले आहे. हे शंभरावे संमेलन ही यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व सोलापूरकर नागरिक सहभाग देतील अशी अपेक्षा व्यक्त करून या संमेलनासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना आणावे असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिने अभिनेते भाऊ कदम व मान्यवरांच्या हस्ते नटराज मुर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करून शतक महोत्सवी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नाट्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय साळुंखे यांनी केले तर आभार प्रशांत बडवे यांनी मानले.

                                                                                    000