मुंबईत उद्या १० ठिकाणी ‘महा स्वच्छता अभियान’; गेट वे ऑफ इंडिया येथून सकाळी ९ वाजता प्रारंभ

महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकर तसेच सर्व घटकांनी स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन 

      मुंबई,दि.30:-बृहन्‍मुंबई महानगरपालिका राबवित असलेली ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ महाराष्ट्र शासनाकडून राज्‍यभर विस्‍तारली जाणार आहे. त्या अनुषंगाने स्वच्छतेचे प्रात्यक्षिक सर्वांसमोर करता यावे, यादृष्टीने उद्या रविवारी म्हणजे दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईत एकूण १० ठिकाणी ‘महा स्वच्छता अभियान’अर्थात “मेगा डीप क्लिनिंग ड्राइव्ह” उपक्रम राबविला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९ वाजता या महा स्वच्छता अभियानाला भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया येथून प्रारंभ होणार आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी स्वच्छता, संयंत्रांच्या सहाय्याने स्वच्छतेची प्रात्यक्षिके आणि स्थानिक लोकसहभाग असा सर्वांचा मेळ साधून ही महा स्वच्छता होणार आहे.

राज्‍याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी देखील यावेळी उपस्थित असतील.

मुख्‍यमंत्री श्री.शिंदे यांच्‍या निर्देशानुसार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चहल यांच्‍या मार्गदर्शनाखाली, बृहन्‍मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक ३ डिसेंबर २०२३ पासून दर आठवड्यात एक दिवस प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) राबविण्‍यात येत आहे. ही मोहीम महाराष्ट्रभर विस्तारण्याची घोषणा मुख्‍यमंत्री महोदयांनी नुकतीच केली होती. या पार्श्वभूमीवर, येत्‍या रविवारी म्हणजे दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजेपासून मुंबईत दहा ठिकाणी महा स्‍वच्‍छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यात, परिमंडळ १ मधील भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया (ए विभाग), वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यान प्राणिसंग्रहालय (ई विभाग); परिमंडळ २ मध्ये सदाकांत धवन मैदान (एफ दक्षिण); परिमंडळ ३ मध्ये वांद्रे रेल्वे स्थानक पश्चिम (एच पश्चिम विभाग); परिमंडळ ४ मध्ये वेसावे (वर्सोवा) चौपाटी (के पश्चिम विभाग); बांगूर नगर (पी दक्षिण विभाग); परिमंडळ ५ मध्ये  सावरकर मैदान, कुर्ला पूर्व (एल विभाग); अमरनाथ उद्यान (एम पूर्व विभाग); परिमंडळ ६ मध्ये डी मार्ट जंक्‍शन, हिरानंदानी संकूल (एस विभाग); परिमंडळ ७ मध्‍ये ठाकूर गाव (आर दक्षिण विभाग) या ठिकाणांचा समावेश आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहिमेसाठी तयार केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार (एसओपी) या ठिकाणी मोहीम राबवली जाणार आहे. 

      महा स्वच्छता अभियान संदर्भात अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे म्‍हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिका राबवत असलेली संपूर्ण स्वच्छता मोहीम आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात शासनाकडून राबवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महा स्वच्छता अभियानाचा प्रमुख कार्यक्रम गेट वे ऑफ इंडिया येथे सकाळी ९ वाजता होणार आहे. या ठिकाणी सुमारे एक हजार गणवेशधारी स्वच्छता कर्मचारी आवश्यक त्या संसाधनांसह तसेच ई स्वीपर, पॉवर स्वीपर आदी संयंत्रांचे प्रात्यक्षिक सादर करतील. ही प्रात्यक्षिके व प्रत्यक्ष स्वच्छतेची एकूणच कार्यवाही महानगरपालिकेच्या समाजमाध्यमांवरुन थेट प्रक्षेपित करण्यात येतील. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेने तयार केलेली प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्याआधारे त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सुयोग्य अशी स्वच्छता मोहीम राबवता येईल. एकूणच, बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही मोहीम राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मार्गदर्शक स्वरुपाची ठरणार आहे, असे डॉ. शिंदे यांनी नमूद केले.

डॉ.शिंदे म्हणाले, महा स्वच्छता अभियानासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा आवश्यक त्या तयारीनिशी सज्ज आहे. स्‍वच्‍छता कर्मचारी व पुरेशी यंत्रणादेखील तैनात आहे. स्‍वच्‍छतेची कार्यपद्धती लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्यातील इतर शहरे व स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील त्यांच्या स्तरावर अंमलबजावणी करता येईल, अशी सूचना केली आहे. स्‍वच्‍छतेची मोहीम प्रशासकीय स्वरुपाची न राहता त्याला लोकचळवळीचे स्वरुप मिळत आहे. लोकप्रतिनिधींसह शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, स्काऊट व गाईड, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), स्वयंसेवी संस्था, ख्यातनाम व्यक्ती व समाजातील सर्व भागधारक, स्थानिक नागरिक यांनी या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे, यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. शिंदे यांनी दिली.