शेगाव – पंढरपूर मार्गावरील रखडलेली कामे पूर्ण करावीत – उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 02 : शेगाव – पंढरपूर महामार्गावर काही ठिकाणी पुलांचे काम कामे पूर्ण नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या महामार्गावरील रखडलेली कामे संबंधित कंत्राटदार कंपनीने पूर्ण करावीत. कामे पूर्ण न केल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिल्या.

मंत्रालयात शेगाव-पंढरपूर महामार्गावरील रखडलेल्या कामांबाबत बैठक मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला आमदार सर्वश्री बबनराव लोणीकर, अमोल मिटकरी, बच्चू कडू, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता संदीप श्रावणे, श्री. सुरवसे आदी उपस्थित होते, तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण वानखेडे व अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, कंपनीने काम पूर्ण न करता जाऊ नये, रखडलेली कामे पूर्ण करावीत. कंत्राटदार कंपनीला नोटीस देऊन 15 दिवसांत काम पूर्ण करण्याची मुदत द्यावी. त्यानंतरही कंपनीने काम पूर्ण न केल्यास कायदेशीर कारवाई प्रस्तावित करावी. कंपनीने गौण खनिजकर बुडविला असल्यास दंड लावावा, दंडाची वसुली करावी. शेतकऱ्यांची जमीन, गौण खनिज ठेवण्यासाठी किंवा रस्ता कामाचे साहित्य ठेवण्यासाठी उपयोगात आणली असल्यास त्यांना मोबदला द्यावा. नाहक शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

****

नीलेश तायडे/विसंअ/