गावांमध्ये एकाच वेळी स्वच्छतेचा पायलट प्रकल्प ठाणे जिल्ह्यात यशस्वी; भविष्यात देशभरातील सहा लाख गावांमध्ये राबविण्याचा प्रयत्न – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

ठाणे, दि.3 (जिमाका) :– नववर्षाचा संकल्प म्हणून ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात एकाच वेळी स्वच्छता कार्यक्रम राबविण्याचा पायलट प्रकल्प ठाणे जिल्ह्यात आज यशस्वी झाला. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, केंद्र सरकारचा पंचायती राज विभाग आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने या मोहिमेत गावागावांमध्ये हजारो श्री सदस्य, ग्रामस्थ आणि राज्य सरकार व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाच्या यशानंतर भविष्यात देशातील सहा लाख ४० हजार गावांमध्ये स्वच्छतेचा जागर एकाच दिवशी करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील या पायलट प्रकल्पाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते दिवेअंजुर येथे झाला. श्री. कपिल पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी झाडू घेऊन साफसफाईला प्रारंभ केला. त्यानंतर जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात मोहीमेला सुरुवात झाली. दिवेअंजुर येथे झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, उपविभागीय अधिकारी अमित सानप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, तहसीलदार अधिक पाटील, गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे, सरपंच रेश्मा पाटील, उपसरपंच मयुर पाटील आदींची उपस्थिती होती.  या वेळी उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ मध्ये भारताला विकसित राष्ट्र करण्याचे ध्येय ठेवले आहे. तर केंद्रीय पंचायती राज विभागाने गावांच्या विकासासाठी निश्चित केलेल्या ९ ध्येयामध्ये `स्वच्छ व हरित गाव आणि आरोग्यदायी गाव’ या ध्येयाचा समावेश आहे. ते ध्येय साध्य करण्याबरोबरच `विकसित भारत’मध्ये योगदान देण्याबरोबच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरू केलेल्या डीप, क्लीन आणि ड्राईव्ह मोहीमेपासून प्रेरणा घेत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून नववर्षाचा संकल्प म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात हा पायलट प्रकल्प राबविण्यात आला. जिल्ह्यातील ठिकठिकाणी झालेल्या स्वच्छता मोहीमेत हजारो ग्रामस्थांनी सहभाग घेतला. मुरबाड तालुक्यातील किशोर येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे आमदार किसन कथोरे, कल्याण तालुक्यातील म्हारळ येथील कार्यक्रमात कुमार आयलानी सहभागी झाले होते. या अभियानात महत्वपूर्ण सहभागाबद्दल डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासह हजारो श्री सदस्यांचे श्री. कपिल पाटील यांनी आभार मानले.

विकसित भारतासाठी ग्रामीण भागाचे योगदान महत्वाचे राहणार आहे. ठाणे जिल्ह्यातील मोहीम यशस्वी झाल्यानंतर भविष्यातील देशातील २ लाख ६० हजार ग्रामपंचायती व ६ लाख ४० हजार गावांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल. तर ठाणे जिल्ह्यात सर्व नागरिकांच्या सहकार्याने पंधरवडा वा महिन्यातून नियमित स्वरुपात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी घोषणाही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली.

0000000000000