मुंबई, दि. 4 : वरळी कोळीवाड्यातील रहिवाश्यांच्या सोयीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, मत्स्यव्यवसाय विभाग, बंदरे विभाग, मेरिटाइम बोर्ड आदी यंत्रणांमार्फत विकास कामे सुरू आहेत. ही कामे तातडीने आणि दर्जेदाररित्या पूर्ण करावीत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
मंत्री श्री.केसरकर यांनी गुरुवारी वरळी कोळीवाडा येथे भेट देऊन सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. स्थानिक रहिवाशी, मच्छिमार बांधवांशीही त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या तसेच सूचना जाणून घेतल्या. यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार, जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्यासह विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिकेमार्फत यावेळी सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, स्थानिकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोल्फादेवीच्या यात्रेपूर्वी तेथील रस्त्याचे काम पूर्ण करावे. कोळी बांधवांच्या खाद्य संस्कृतीचा प्रसार व्हावा याबरोबरच महिला सक्षमीकरणावर शासनाचा भर आहे. त्या अनुषंगाने कोळीवाडा येथे फूड कोर्टचे काम तातडीने सुरू करण्यात यावी. येथील क्लिव्ह लॅण्ड जेटीवर समुद्राच्या लाटांपासून बचाव करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या भिंतीचे काम 7 दिवसात सुरू करा, स्थानिकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठीच्या जागेची दुरूस्ती करून ती वापरण्यायोग्य करा. वरळी किल्ल्याजवळील परिसर सुशोभित करून तेथे नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या, येथील मैदानाचा विकास करून खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश श्री. केसरकर यांनी दिले.
यावेळी नऊपाटील जमात इस्टेट, वरळी कोळीवाडा ओनर्स असोसिएशन, गावकरी इस्टेट कमिटी, अन्य स्थानिक मच्छिमार संस्था आदींच्या प्रतिनिधींनी मंत्री श्री.केसरकर यांच्याशी संवाद साधताना कोळीवाड्यांच्या विकासासंदर्भातील त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. मंत्री श्री.केसरकर यांनी नागरिकांच्या समस्या आणि सूचना जाणून घेऊन त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना उचित कार्यवाहीच्या सूचना केल्या. एका आठवड्यानंतर येथे पुन्हा भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
0000
बी.सी.झंवर/विसंअ/