विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग गरजेचा – प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा

  • विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांचे प्रतिपादन

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागात शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसमवेत श्री. मिश्रा यांनी साधला संवाद

भारत सन २०४७ पर्यंत विकसित देश होणार आहे. हा टप्पा गाठताना भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण व्हावा, लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग गरजेचा आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रमुख सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी केले.

‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या निमित्ताने प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रमुख सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी मुंबईतील विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी आज (दिनांक ४ जानेवारी २०२४) संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे संपूर्ण देशभरात दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्र शासनाने विशेष स्वरुपाची वाहने तैनात केली आहेत. बृहन्मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये विशेष चार वाहनांद्वारे दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ ते दिनांक २६ जानेवारी २०२४ पर्यंत या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.

याचाच एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पी उत्तर’ विभागातील गोरेगांव (पूर्व) मध्ये नागरी निवारा परिषदेजवळ माँसाहेब मीनाताई ठाकरे क्रीडांगण येथे आज (दिनांक ४ जानेवारी २०२४) स्थानिक नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रमुख सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला.

महाराष्ट्राचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, आमदार श्रीमती विद्या ठाकूर, आमदार श्री. अमीत साटम, आमदार श्री. राजहंस सिंह, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे,  जिल्हाधिकारी (मुंबई उपनगरे) श्री. राजेंद्र भोसले, उपायुक्त (परिमंडळ ४) श्री. विश्वास शंकरवार,  सहायक आयुक्त (पी उत्तर) श्री. किरण दिघावकर, संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शहा,  आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला चित्रफीतीद्वारे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांचा संदेश दाखविण्यात आला.

‘विकसित भारत संकल्प यात्रे’बाबत डॉ. पी. के. मिश्रा म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रा अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका खूप प्रयत्न करीत आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन करतो. आज येथे व्यासपीठावर लाभार्थ्यांचे अनुभव ऐकताना ही यात्रा तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे, याबाबत आनंद वाटला. सन २०४७ पर्यंत आपण एक विकसित राष्ट्र होऊ शकतो, याबाबत नागरिकांमध्ये विश्वास आणि जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे. तेच काम आपण विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे करीत आहोत. या यात्रेत आतापर्यंत ९ कोटी नागरिक जोडले गेले आहेत. दोन कोटीपेक्षा जास्त नागरिकांची या यात्रेदरम्यान आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आपल्या देशातील युवक, महिला, सुशिक्षित बेरोजगार,उद्योजक यांना याद्वारे आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी मिळाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान ‘संकल्प शपथ’ घेण्यात आली. तसेच ‘मेरी कहानी मेरी जुबानी’ या अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात चार लाभार्थ्यांनी मान्यवरांसमोर अनुभव मांडले. त्यानंतर मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजना, आयुष्मान कार्ड लाभार्थी, दिव्यांग लाभार्थी आदींना प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र व धनादेश वाटप करण्यात आले.  तसेच पाच महिला लाभार्थ्यांना शिलाई संयंत्रांचे वितरण करण्यात आले.

आरोग्य तपासणी, उज्ज्वला योजना, विविध क्रीडा योजना, आधारकार्डशी संबंधीत कामकाज आदींचे दालन कार्यक्रमस्थळी उभारण्यात आले होते. या सर्व दालनांना श्री. मिश्रा यांनी भेट दिली. तसेच दालनांवर उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून कोणकोणत्या योजनांना नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय, याबाबत देखील त्यांनी माहिती घेतली.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री लोढा म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रेला डॉ. पी. के. मिश्रा यांची उपस्थिती प्रेरणादायी ठरली आहे. यापुढे ही यात्रा अधिकाधिक यशस्वी करण्याची आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आपण सर्वजण मिळून विकसित भारताचे स्वप्न साकार करूया, असे श्री. लोढा यांनी नमूद केले.

संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांनी सूत्रसंचालन केले.

****