वेळेचे योग्य नियोजन हाच यशस्वी जीवनाचा मंत्र : राज्यपाल रमेश बैस

0
9

नाशिक, दि. ५ जानेवारी, २०२4 (जिमाका वृत्तसेवा) : वेळ हा विद्यार्थ्यांचा चांगला मित्र आहे. त्यामुळे वेळेचा कार्यक्षमतेने वापर करून योग्य नियोजन केल्यास जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते. ज्ञानाचा विस्तार करण्यासोबतच उद्दिष्टे निश्चित करणे, कौशल्ये सुधारणे आणि खुल्या संधीचा पुरेपूर वापर करण्यासाठी आतापासूनच वेळेचे नियोजन करावे, असा मोलाचा संदेश महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांना दिला.

संदीप विद्यापीठाचा प्रथम दीक्षान्त समारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संदीप विद्यापीठाचे कुलगुरू पंडित नित्यानंद झा, चेअरमन डॉ. संदीप झा, उप कुलगरु डॉ. राजेंद्र सिंन्हा, माजी खासदार प्रभात झा, अलोक झा, आर्यन झा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यपाल रमेश बैस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आज या व्यासपीठावर सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे, त्यांचेदेखील यावेळी विशेष अभिनंदन. अशा कार्यक्रमांमधूनच आजच्या युवा पिढीशी संवाद साधता येतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल व त्यांना मिळालेल्या पदवीसाठी त्यांचे अभिनंदन केले.

आपल्या देशाचे भविष्य तरुणांच्या हाती आहे. ही तरुणपिढी उद्याच्या भारताचे नेतृत्व करणार असून आज मिळालेल्या पदवीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवणार आहे. संदीप विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि विद्यापीठावर देश घडविण्याची मोठी जबाबदारी आहे, असे ही राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सांगितले.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. भारताच्या सुवर्ण युगाची सुरुवात करण्यात आजची ही युवा पिढी महत्त्वाची भूमिका बजावणार, यात काही शंका नाही. आज विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधण्यासाठी विविध क्षेत्रांची कवाडे खुली झाली आहेत. विद्यार्थ्यांची मेहनत आणि अभ्यासाप्रती असलेले समर्पण आज ज्या स्थानावर घेऊन गेले आहे. याचे श्रेय विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या प्राध्यापक आणि पालकांना जाते. आता, तुम्ही सर्व करिअरच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहात. प्रत्येक दिवस नवीन आव्हाने आणि नवीन धडे घेऊन येईल. ही आव्हाने संधी म्हणून स्वीकारण्यास सज्ज व्हा, असे आवाहनही राज्यपाल श्री. बैस यांनी विद्यार्थ्यांना केले.

ध्येय ठरवताना अपयशी होण्यास घाबरू नका. अपयश हा जीवनाचा एक भाग आहे, जीवनाचा शेवट नाही. त्यामुळे अपयशापुढे खचू नका. जगातील यशस्वी लोकांच्या जीवनाचा प्रवास पाहिल्यास, समजते की अपयश हे त्यांच्या जीवनाचा देखील एक भाग आहे. पण त्यांनी त्या अपयशाला संधी म्हणून स्वीकारले आणि त्याच संधीच्या बळावर त्यांनी यश संपादन केले आहे, असा मोलाचा सल्ला देखील राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

राज्यपाल विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील क्षमता, कौशल्ये आणि ज्ञान जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचे जतन करणे आवश्यक आहे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी करिअरसोबतच मानसिक आरोग्याची ही काळजी घ्या. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० देशाच्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे बनवले गेले आहे. या शैक्षणिक धोरणाने आकांक्षी उद्दिष्टांसह विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि पुनर्रचना करण्यात आल्याचेही राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले. हे नवे शैक्षणिक धोरण प्राचीन आणि शाश्वत भारतीय ज्ञान आणि विचारांच्या समृद्ध परंपरेवर आधारित आहे. भारतीय विचार परंपरा आणि तत्वज्ञानात ज्ञान, शहाणपण आणि सत्याचा शोध हे नेहमीच सर्वोच्च मानवी ध्येय मानले गेले असल्याचे श्री. बैस यांनी सांगितले.

संदिप विद्यापीठाचे चेअरमन संदिप झा विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ परिक्षेतच विशेष प्राविण्य प्राप्त केले नसून इतर सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमातही आपला सहभाग नोंदविला आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात ध्रुव ताऱ्याप्रमाणे आपले स्थान निश्चित करावयाचे आहे. जेणेकरून आपला आदर्श इतरांना मार्गदर्शक ठरेल. प्रत्येकात एक विशिष्ठ गुणवत्ता असते, तिचा विकास करणे हे आपल्या हातात आहे. त्यासाठी मेहनत व नाविन्यपूर्ण गोष्टी शिकण्याची उमेद आवश्यक आहे. भावी आयुष्यात काम करतांना त्यातून आनंद मिळवणे देखील महत्त्वाचे असते. लर्न मोर ॲण्ड अर्न मोर हा मूळ मंत्र लक्षात ठेवून उज्ज्वल प्रगती करा, अशा शुभेच्छा ही यावेळी त्यांनी दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमात पंडित नित्यानंद झा व प्रभात झा यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाचे उप कुलसचिव श्री. बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना पदवीदानाची शपथ दिली. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात राज्यपाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी व सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

0000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here