मुंबईत ॲप आधारित १६९० कॅबची तपासणी; १९.७६ लाख रुपयांचा दंड वसूल

मुंबई, दि. 5 : मुंबई शहर आणि उपनगरातील परिवहन कार्यालयातील कार्यरत वायुवेग पथकांकडून ॲप आधारित कॅब वाहनांची व चालकांची नियमितपणे तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान विहीत केलेल्या अटी व शर्थींचे उल्लंघन करणाऱ्या, दोषी वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा व नियमांतर्गत कारवाई करण्यात येते. मुंबई शहर व उपनगरांत 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ॲप आधारित 1690 कॅब वाहनांची तपासणी करण्यात आली. दोषी आढळलेल्या 491 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईपोटी 19 लाख 76 हजार 900 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई (मध्य) कार्यालयांतर्गत 590 वाहनांची तपासणीमध्ये 107 दोषी वाहनांवर 7 लाख 42 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मुंबई (पश्चिम) कार्यालयांतर्गत 782 वाहनांची तपासणीमध्ये 211 वाहने दोषी आढळली आहेत. यामध्ये 7 लक्ष 93 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई (पूर्व) कार्यालयांतर्गत 318 वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 173 वाहने दोषी आढळली व त्यांच्याकडून 4 लक्ष 41 हजार 400 रुपयांचे दंडापोटी तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 13 फेब्रुवारी 2023 रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यात ॲप आधारित वाहनांसाठी महाराष्ट्र रेग्युलेशन ऑफ द ॲग्रेगेटर रुल्स, 2022 करण्यासाठी निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने 27 नोव्हेंबर 2020 रोजी समुच्चयक मार्गदर्शक सूचना ॲप आधारित  कॅब सेवा देणाऱ्या आस्थापनांकरीता निर्गमित केल्या आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (पूर्व) विनय अहिरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

0000

निलेश तायडे/विसंअ/