महिला सशक्तीकरण अभियानातून ३८ हजार ५०० लाभार्थ्यांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गडचिरोली, दि. ९ : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ गडचिरोली येथून होत आहे. महिलांच्या आयुष्यात नवीन क्रांती घडवून आणणारा हा आजचा दिवस आहे. या अभियानातून शासनाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील ३८ हजार ५०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी शासनाने गेल्या दीड वर्षात महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. यापुढील काळात देखील महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

गडचिरोली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.  

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  राज्य शासनाने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली असून बचतगटाच्या अर्थसहाय्यात दुप्पट वाढ केली आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर आज प्रथमच गडचिरोलीमध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. राज्याला कर्तृत्ववान महिलांचा वारसा आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या एक पाऊल पुढे आहे. राज्यात आतापर्यंत ४ कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यासाठी आतापर्यंत वापरण्यात येणारा मागास हा शब्द पुसून टाकला असून मुख्य प्रवाहाकडे गडचिरोली जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. सुरजागडच्या माध्यमातून १० हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या उद्योगाचे विस्तारीकरण लवकरच होणार असून आणखी १० ते १५ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, टिलर, ड्रोजर, हार्वेस्टर, तर शालेय मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. भविष्यात गडचिरोलीतील १० हजार शालेय मुलींना सायकलींचे वाटप करण्यात येईल.

‘शासन आपल्या दारी’ योजनेतून राज्यातील जवळपास 2 कोटी 20 लाखांपेक्षा जास्त जणांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच येथे उभारण्यात आलेल्या स्कील सेंटरमधून दरवर्षी 5 हजार तरुण- तरुणींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येईल. राज्यातील 1 कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न असून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच ब्रँडिंग, मार्केटिंग आदी बाबींकरीता जिल्हा प्रशासनाला सूचना करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

महिला बचत गटांना ७ हजार कोटींचे कर्ज  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकूण लोकसंख्येमध्ये 50 टक्के वाटा असलेल्या महिलांचे जोपर्यंत सशक्तीकरण होत नाही, तोपर्यंत भारत विकसीत होऊ शकत नाही, ही संकल्पना घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांचे जीवनमान उंचाविण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. राज्य शासनही महिलांच्या विकासासाठी कटिबध्द असून प्रत्येक बचतगट सक्षम होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. महिलांना कर्ज दिले, तर त्याची परतफेड करण्याचे प्रमाण 100 टक्के आहे. गतवर्षी म्हणजे सन 2023 मध्ये राज्य शासनाने 7 हजार कोटी रुपयांचे कर्ज महिला बचत गटाला उपलब्ध करून दिले, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी उज्ज्वला गॅस जोडणी, हर घर जल, हर घर बिजली आदी योजना सुरू केल्या. तसेच स्टार्ट अप योजनेतून नव उद्योजकांना 25 कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले असून यापैकी महिलांना 13 कोटी रुपये कर्ज देऊन स्वत:च्या पायावर उभे केले आहे. ‘लेक लाडकी’ योजनेतून मुलीच्या जन्माचे स्वागत तसेच 18 वर्षापर्यंत राज्य शासन 1 लाख रुपये देणार आहे. तसेच मुलींचे मोफत शिक्षण राज्य सरकार करीत असून एस.टी.च्या तिकीट दरामध्ये महिलांना 50 टक्के सवलत आहे.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून गडचिरोलीतील महिलांना मदत मिळत आहे. हे अभियान 365 दिवस सुरू राहणार आहे. भविष्यात गडचिराली ही देशाची स्टील सीटी होऊ शकते. येथे येणा-या कोणत्याही प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्याची राज्य शासनाने अट ठेवली आहे. जल, जमीन, जंगल हा आदिवासींचा अधिकार असून पर्यावरणाचे रक्षण करूनच गडचिरोलीचा विकास केला जाईल. राज्यातील पुढारलेल्या जिल्ह्यात गडचिरोलीचे नाव होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मंत्री श्री. आत्राम म्हणाले की, खनिकर्म उद्योगातून जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच विकास कामांमधून जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी शासन कटिबध्द आहे, यावेळी खासदार श्री. नेते यांनी मनोगत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी श्री. मीना यांनी प्रास्ताविक केले.

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नवरत्न महिलांचा सत्कार

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील नवरत्न महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात सुलोचना मडावी (पेसा अंतर्गत ग्रामसभेसाठी विशेष पुढाकार), मनीषा मडावी (फॅशन डिझायनिंग व व्यक्तिमत्व विकास), संगीता युरोजवार (कोरोनामध्ये 100 टक्के लसीकरण), सविता भोयर (रंगभूमीत योगदान), रुपाली मोहुर्ले (दारुबंदीसाठी लढा), किरण कुमावार (शिक्षण क्षेत्र), जमुना देहारी (बचतगटाची चळवळ,) पोलिस उपनिरीक्षक कल्याणी पुट्टेवार (दुर्गम भागात स्वतंत्र पोलिस स्टेशनचा प्रभार) आणि टेबू उसेंडी (शिवणकाम प्रशिक्षक) यांचा समावेश होता. याशिवाय कविता मेहक्षेत्री आणि ज्योती कुंडारकर यांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.

149 कोटी 75 लक्ष रुपयांच्या 30 विकासकामांचे भूमिपूजन

यावेळी मान्यवरांच्या हस्ते 100 मोबाईल टॉवर, प्राथमिक आरोग्य पथक (ग्यारापत्ती), मानव विकास मिशन अंतर्गत 8 एकल गोडाऊन,  एकल सेंटर, आदिवासी विभागाचे शाळा व वसतिगृह, तलाव सौदर्यींकरण, नगर परिषद व नगर पंचायत प्रशासकीय इमारत, तालुका क्रीडांगण, वघाडा-सायगाव-शिवणी-डोंगरगाव मोठ्या पुलाचे बांधकाम करणे (ता. आरमोरी), चोप-तमाशीटोला ते वडसा मोठ्या पुलाचे बांधकाम करणे. (ता. वडसा) सानगडी-गोठणगाव-कुरखेडा-मालेवाडा-रामा-मोठ्या पुलाचे बांधकाम करणे (ता. धानोरा), सानगडी- गोठणगाव-कुरखेडा-मालेवाडा-रामा-ची सुधारणा करणे (ता. कुरखेडा), मौशीखांब-वडधा-शंकरपूर-कोरेगाव रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे (ता. वडसा),  मोशीखांब-वडधा-शंकरपूर-कोरेगाव रस्ता सुधारणा करणे कुरखेडा-वैरागड रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (ता. आरमोरी),  मार्कण्डा देवस्थान नुतनीकरण, चपराळा देवस्थान अशा एकूण 149 कोटी 75 लक्ष रुपयांच्या 30 कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

लाभार्थ्यांना धनादेश वाटप : अझिमा अब्दुल अझीझ पंजवानी, क्रितिका खोब्रागडे, मनीषा भोयर, रत्नमाला बावणे, गीता वाघाडे, पल्लवी कोसरे, वर्षा चौधरी, किर्ती भुरसे, पायल झंझाळ, माधुरी देवगीरकर, कल्पना म्हशाखेत्री, कनक नैताम, सृष्टी खोब्रागडे, वैशाली खोब्रागडे, जानव्ही मेहेरे, रागिणी मेहेरे, डॉली महानंदे यांच्यासह बेरोजगार अंध समितीचे संध्या दादगाये, शुभांगी गेडाम, वर्षा दुर्गे व इतर लाभार्थ्यांना विविध योजनांच्या आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.

पारंपरिक पद्धतीने स्वागत : मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पारंपरिक आदिवासी टोप घालून तसेच रेला नृत्याने स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानच्या थीम साँगचे उद्घाटन करण्यात आले.

००००