कोकण विभागातील जिल्हा वार्षिक योजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय आढावा

मुंबई, दि. 9 :- कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या सात जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय आढावा घेतला. जिल्हा विकास निधीमधून करण्यात येणारी कामे व्यापक लोकहित साधणारी, दर्जेदार असावीत. कोकणात मोठी पर्यटन क्षमता आहे, त्याचा वापर करून रोजगार, उद्योगवाढीसाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्याच्या मानवी विकास निर्देशांकात वाढ होईल, अशा कामांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेतला. बैठकीस केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुंबई  शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, रायगड व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्ग व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह मुंबईचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके तसेच संबंधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

वंदना थोरात/विसंअ/