‘जाणता राजा’ महानाट्याचा आज प्रयोग; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

नागपूर, दि.१२*: स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा उलगडणाऱ्या ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक महानाट्याच्या राज्यभर आयोजित होणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उद्या दि.१३ जाऐवरी रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील यशंवत स्टेडियमवर होणार आहे.
नागपुरातील ७० कलाकार यात सहभागी होणार आहेत. शहरात आतापर्यंतचा या महानाट्याचा ६वा प्रयोग असणार आहे.
         छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमीत्याने राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या महानाट्याच्या प्रयोगातील हा पहिला प्रयोग आहे. जिल्हा व महानगरपालिका प्रशासनामार्फत यशवंत स्टेडियम परिसरात महानाट्यासाठी स्टेज, सीसीटीव्ही कॅमेरे, कचरागाड्यांची व्यवस्था, साईड पॅनल आदिंसह आयोजनाची यशस्वीरीत्या संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
        शहरात  “जाणता राजा” या ऐतिहासिक महानाट्याचा जवळपास ६वा प्रयोग होणार आहे. वर्ष १९९२ मध्ये शिव कथाकार विजयराव देशमुख यांच्या पुढाकाराने या महानाट्याचा प्रयोग घेण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५०व्या वर्षानिमित्त आयोजित या महानाट्यामध्ये २०० पेक्षा अधिक कलाकार आणि तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत.नागपूरातील १४४  वा प्रयोग असणार. राणी सईबाई, कान्होजी जेथे, तानाजी मालुसरे, अष्टप्रधान बाल शिवाजी आदींमध्ये नागपूरकर कलाकार दिसणार आहेत.
      १९८५ साली पुण्यात या महानाट्याचा पहिला प्रयोग झाला होता. आतापर्यंत महाराष्ट्राशिवाय अमेरिका, इंग्लंड या देशांसह भारतातील एकूण ११ राज्यांमध्ये ११४३ प्रयोग झाले आहेत.
          छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मावळे जमवून बाल शिवाजींनी स्वराज्य स्थापनेचा घेतलेली प्रतिज्ञा, अफजलखान वध आदिंसह   प्रसंगानुरूप फिरत्या रंगमंचा समोर घोडे आणि उंटाहून जाणारा लवाजमा. तसेच, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्यावेळी फटाक्यांची आकर्षक आतषबाजी बघायला मिळणार आहे.
    जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांसह नागपुरकरांनी सहकुटुंब हा प्रयोग बघण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. प्रवेश मोफत असून प्रवेशिकेद्वारे प्रवेश मिळणार आहे.  दि.१४ व १५  जानेवारीला दररोज सायंकाळी ६.३० ला प्रयोगाची सुरुवात होणार आहे.
            ०००००