युवक-युवतींनी लोकनृत्यातून घडविले सांस्कृतिक एकतेचे दर्शन

नाशिक, दि. 15 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक येथे सुरु असलेल्या 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात आज चौथ्या दिवशी महाकवी कालिदास कलामंदिरात विविध राज्यातील युवक-युवतींनी लोकनृत्यातून आपापल्या भागातील लोकनृत्य, संस्कृती आणि सभ्यतेचे दर्शन घडविले. आसामच्या युवक युवतींनी सादर केलेल्या बिहू नृत्याला उपस्थित दर्शकांनी भरभरुन दाद दिली.

नाशिक येथे 12 जानेवारीपासून 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात आज सकाळी महाकवी कालिदास कलामंदिरात विविध राज्यातून आलेल्या युवकांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात सामूहिक व वैयक्तिक लोकनृत्य सादर केली. यावेळी केंद्रीय युवक कल्याण विभागाच्या संचालक विनिता सूद, स्पर्धेचे समन्वयक परमजित सिंह, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील उपस्थित होते.

आज सकाळच्या सत्रात आसाम, केंद्र शासित प्रदेश लडाख, जम्मू आणि काश्मीर, सिक्कीम, नागालँड, केरळ, हरियाणा या राज्यातील युवक – युवतींनी लोकनृत्य सादर केली. आसामच्या अप्सरा शिलंग हिने उत्कृष्ट अदाकारी सादर करीत वैयक्तिक बिहु नृत्य सादर केले. बिहू नृत्य हे आसाम राज्यातील प्रमुख लोकनृत्य आहे. आसामचे वैशिष्ट्य आणि संस्कृती असलेल्या बिहू उत्सवांच्या काळात हे नृत्य केले जाते. रोंगाली बिहू, काटी बिहू, माघ बिहू या उत्सवांच्या काळात बिहू नृत्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

लडाख बॅगस्ट नर्चेस नृत्य सादर केले. या नृत्याच्या माध्यमातून युवतींनी लडाखची प्राचीन संस्कृती, सभ्यता आणि आपल्या परंपरेचे दर्शन घडविले. त्यापाठोपाठ निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या युवतींनी लोकनृत्य सादर करीत आपल्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले.  कुलदेवता, देवी-देवता यांची आराधना या नृत्याच्या माध्यमातून केली जाते. जम्मू आणि काश्मीरच्याच किश्तवाड जिल्ह्यातील नितेश शर्मा याने पाडरी हे आगळे-वेगळे लोकनृत्य सादर करीत उपस्थितांची दाद मिळविली.

सिक्कीम, नागालँड, केरळ, हरियाणाच्या युवक – युवतींनी सामूहिक आणि वैयक्तिक नृत्य सादर करीत आपापल्या राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. मयंक झा यांनी सूत्रसंचालन केले.