प्रधानमंत्री जनमन महाअभियानाचे उद्घाटन; केळापूरमधील धारणा येथून जिल्ह्यात महाअभियानाला सुरुवात

यवतमाळ, दि. १५ : केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय (पीएम जनमन) महाअभियान देशभरात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील या महाअभियानाचे उद्घाटन केळापूर तालुक्यातील धारणा येथे प्रधानमंत्र्यांच्या दुरदृष्य उपस्थितीत करण्यात आले.

या महाअभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी आमदार प्रा.डॅा.अशोक उईके, आमदार डॉ.संदीप धुर्वे,  जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक याशनी नागराजन, प्रकल्प संचालक आत्माराम धाबे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या मंजूर लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधतांना या अभियानाची माहिती दिली. तसेच आदिवासी समाजातील संस्कृती, लोककलेचे कौतूक केले. केंद्र सरकारने या अभियानासाठी सुमारे २३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या दोन महिन्यात देशभरातील अनेक अतिमागास आदिवासी बांधवाना किसान कार्ड, आयुष्मान कार्ड, वनपट्टे आदी लाभ देण्यात आले. आदिवासींना हक्काचे पक्के घर बनविण्यासाठी देशभरात एक लाख लोकांना आज अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यांना घरासाठी २.५० लाख रूपये दिले जात आहे. या घरासोबत वीज, पाणी, शौचालय, गॅस या सुविधा मिळणार आहे.

प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सरकार पोहोचेल. एकही आदिवासी बांधव योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी संवाद साधताना दिली. यावेळी योजनांच्या माध्यमातून परिवर्तन घडविणाऱ्या लाभार्थ्यांसोबतही त्यांनी संवाद साधला.

आमदार डॉ.संदीप धुर्वे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, प्रधानमंत्री जनमन महाअभियानाला मूर्त स्वरुप देण्यासाठी प्रशासनाने काम करावे. प्रत्येक गावात शिबीर आयोजित करुन आदिवासींना योजनांचा लाभ मिळवून द्यावा. हे महाअभियान यशस्वी करावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी आ.डॅा.अशोक उईके यांनीही हे महाअभियान यशस्वीपणे राबवावे, असे सांगितले.

गेल्या एका महिन्यात जिल्ह्यातील कोलाम आदिवासी भागात सुमारे १६० शिबीरे आयोजित करुन २० हजार नवीन आयुष्मान कार्ड, ५०० नवीन आधार कार्ड वितरित करण्यात आले. १५०० आधार कार्ड अद्ययावत करण्यात आले. जिल्ह्यात जवळजवळ एक लाख कोलाम आदिवासी लोकसंख्या आहे. मागील दोन महिन्यात याचा सर्वे करण्यात आला असून त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक याशनी नागराजन यांनी दिली.

प्रधानमंत्र्यांनी साधला लाभार्थीसोबत संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दि.१५ नोव्हेंबर २०२३ रोजी झारखंडच्या खुंटी गावातून जन जातीय गौरव दिनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (जनमन) सुरु केले आहे. या अभियांनांतर्गत पंतप्रधानांनी देशभरातील आदिवासी बांधव, महिला व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी येथील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यात केळापूर तालूक्यातील धारणा या गावातून आमदार संदीप धुर्वे, आमदार डॅा. अशोक उईके यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, आदिवासी बांधव आणि विविध योजनांची लाभार्थी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

०००