लोकसंगीत देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा ठेवा – मंत्री सुधीर मुनगंटीवार

0
8

मुंबई, दि. 17 :- लोक संगीताचे सूर मनात  ऊर्जा व चैतन्य निर्माण करतात. लोकसंगीत हे देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा ठेवा आहे. आईच्या आवाजानंतर मनाला ऊर्जा देणारा दुसरा आवाज म्हणजे लोकसंगीताचा आवाज आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

गोरेगाव येथील स्टुडिओमध्ये सुरू असलेल्या प्रसिद्ध  गायक कैलास खेर यांच्या भारत का अमृत कलश कार्यक्रमास मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी भेट देऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी कार्यक्रमात सहभागी कलाकारांशी संवाद साधताना त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी गायक कैलास खेर यांनी त्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले.

मनाला ऊर्जा देणाऱ्या लोकसंगीताच्या स्वरांनी आपण आज मंत्रमुग्ध झालो आहोत. गायक हे कोहिनूर पेक्षाही श्रेष्ठ असतात, असे गौरवोद्गार काढून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व गायक व कलाकारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।। या कवितेचे वाचन केले.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here