स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई, दि. २३ : मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून येथे हे महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता अभियानात अग्रेसर असतांना येत्या काळात या अभियानात मुंबई देखील देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुंबईत सुरु असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) बाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहूल शेवाळे, आमदार राम कदम, मुंबई महापालिकेचे अतिरीक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी, अश्विनी भिडे, पी.वेलारासू, सुधाकर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, डीप क्लिन ड्राईव्हला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद लाभत असून परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती होत आहे. ही मोहिम मुंबईच्या प्रत्येक गल्ली आणि रस्त्यापर्यंत पोहचायला हवी. प्रत्येक रस्ता, गल्लीसह सार्वजनिक शौचालये नियमितपणे स्वच्छ व्हायला हवी. या मोहिमेचा परिणाम मुंबईच्या अंतर्गत भागात दिसायला हवा. यासाठी लागणारे मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची गरज भागविण्यासाठी गरज भासल्यास बाहेरील संस्थांची मदत घ्यावी. स्वच्छतेसोबतच झाडे लावणे, हिरवाई तयार करणे, सुशोभिकरण याकडे लक्ष द्यावे. यासाठी तज्ज्ञ संस्थांच्या माध्यमातून मुंबईतील ठिकाणांची निवड करुन त्यांच्यावर सुशोभिकरणाची जबाबदारी सोपवावी. महापालिकेची रुग्णालये, समुद्रकिनारे, मंडई, शाळांचे परिसर यांच्याही स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, मुंबईच्या रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या वाहनांना हटवून स्वच्छता करण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी. मोहिम सुरु झाल्यापासून नागरिकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. मुंबईच्या बदलासाठी ही चांगली सुरुवात आहे. या मोहिमेत स्वच्छता कर्मचारी उत्साहाने योगदान देत आहेत. त्यांच्या सर्व वसाहतींच्या विकासाची कामे तातडीने सुरु करावीत. स्वच्छता मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वार्डातील सहाय्यक आयुक्तांनी थेट फिल्डवर उतरुन काम करावे. वार्डांमध्ये स्पर्धा ठेवून चांगले काम करणाऱ्या वॉर्डांना गौरवण्यात यावे. यामुळे मोहिमेत जास्तीत जास्त चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुंबई महापालिकेच्या विविध वार्डांचे सहाय्यक आयुक्त दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीस उपस्थित होते.
0000