पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ८६ ग्रामपंचायतींना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप

यवतमाळ,दि. 23: शहरी व ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान राबविण्यात येत आहे. त्याची सुरुवात आज दारव्ह्यातून करण्यात आली असून या अभियानांतर्गत ८६ ग्रामपंचायतींना पालकमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले.

जिल्हा नियोजन समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने दारव्हा येथील निधी मंगल कार्यालयात पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतींना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तक व साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत, पुणे येथील सह्याद्री अकॅडमीचे तुषार घोरपडे आदी अधिकारी, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक आणि स्पर्धा परीक्षार्थीं मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने ७५ हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. या पदभरतीची तयारी विद्यार्थी करीत आहेत. त्यांना सहकार्य म्हणून स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि अचूक मार्गदर्शन देण्यासाठी जिल्ह्यात पहिल्यांदाच हा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार ॲानलाईन मार्गदर्शनही मिळणार आहे. हा अभियान जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना अभ्यासिकेसाठी फर्निचरही देण्यात येणार आहे. सरपंच, ग्रामसेवकांनी या अभियानाचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा. हे अभियान लोकचळवळ व्हावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळ केले.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत स्पर्धा परीक्षार्थींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देवून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शिस्त आणि अनुशासन महत्वाचे आहे. साधनांची कमी नाही परंतु त्यांना पूरक सुविधा पुरविण्याचे प्रयत्न शासनाचे सुरु आहे. स्पर्धा परीक्षेत सातत्यपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यातून नक्की यश मिळेल, असे मत व्यक्त केले. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी अनुभव सांगत समाजात मानाचे स्थान मिळवायचे असेल तर शिक्षण महत्वाचे आहे. कुठल्याही परिस्थितीत शिक्षण घेणे गरजेचे आहे. शिक्षणातील गुंतवणूक हीच खरी गुंतवणूक आहे. अभ्यासिकेचा लाभ घ्यावा. गरज पडल्यास सहकार्य व मार्गदर्शन करण्याची तयारी त्यांनी दर्शविली.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रजनीकांत,  पुणे येथील सह्याद्री अकॅडमीचे तुषार घोरपडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी राजीव शिंदे यांनी केले. यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायतींना ६ ते १४ पुस्तकांचे संच हे सरपंच आणि ग्रामसेवकांना सुपूर्द करण्यात आले.