मुंबई, दि. 23 : येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी तसेच इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्त्वाचे सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांप्रसंगी नागरिक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान न करता योग्य सन्मान राखला जाईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
या राष्ट्रीय, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा सामन्यावेळी मोठ्या प्रमाणात छोट्या कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले, राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले आढळतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. अशासकीय संस्था व इतर संघटनांच्या मदतीने नागरिकांनी राष्ट्रध्वज गोळा करुन तहसील कार्यालयात व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे.
००००