मुंबई, दि.२३ : एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८ अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण योजना आखण्यात आल्या आहेत. वस्त्रोद्योग व्यवसायाची एक दर्जेदार शृंखला निर्माण होण्यासाठी शेतकरी, वस्त्रोद्योग घटक आणि रोजगार निर्मितीवर अधिक भर देऊन वस्त्रोद्योग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
आज मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास अधिनियमाचे प्रारूप, टेक्नो टेक्सटाईल पार्क, मिनी टेक्सटाईल पार्क, गारमेंट पार्क, सौर ऊर्जा वापर धोरण, यंत्रमाग व रेडिमेड गारमेंटस उद्योगांना लेबर सबसिडी या विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्व वस्त्रोद्योग घटकांचा मंत्री श्री..पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडिलकर, उपसचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, शेतीशी निगडित असलेल्या तुती लागवड उद्योगातून शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी तुती ते रेशीम ही साखळी अधिक सोपी करून ती विकसित करावी. राज्यात रेशीम उद्योगाला अधिक चालना द्यावी.
दरम्यान राज्यातील हातमाग विणकरांचे सर्वेक्षण करून जनगणना करण्याबाबत आढावा घेण्यात आला. तसेच रेशीम कोश बाजारपेठ व्यवस्थापन संगणक प्रणाली राज्यस्तरीय राबविण्याबाबतही आढावा यावेळी घेण्यात आला.
००००
काशीबाई थोरात/विसंअ