‘टर्बो स्टार्ट’ चर्चासत्रातून नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.25: ‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ अंतर्गत आयोजित ‘टर्बो स्टार्ट’ चर्चासत्रातून नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येतील.’स्टार्ट अप’ची राजधानी म्हणून देशात आपल्या राज्याला ओळखले जाते. आज झालेल्या चर्चासत्रातून अधिकाधिक नाविन्यपूर्ण संकल्पना सुचवणारा स्टार्ट अप जर एखादा उद्योग करण्यासाठी पुढे आल्यास शासन सहकार्य  करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बाॅम्बे स्टॉक एक्सचेंज येथे ‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ अंतर्गत मुंबई फेस्टिव्हल रिंगिंग बेल सोहळा आणि ‘टर्बो स्टार्ट’ चर्चासत्र उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते यावेळी पर्यटनमंत्री गिरीश महाजन, उपमुख्यमंत्र्याचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, पर्यटन सचिव जयश्री भोज, मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा उद्योगपती आनंद महिंद्रा, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, मुंबई स्टॉक एक्सचेंजचे अधिकारी सुभाष केळकर, मुख्य संनियंत्रण अधिकारी के. कमला, विझ क्राफ्ट संस्थेचे संस्थापक सबा जोसेफ यांची उपस्थिती  होती.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, ‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ अंतर्गत ‘टर्बो स्टार्ट’ या चर्चासत्रात मान्यवरांनी मांडलेले विचार निश्चित सर्वांना मार्गदर्शक ठरतील. कोणत्याही नावीन्यपूर्ण संकल्पना अंमलात येण्यासाठी त्यावर अगोदर विचार विनिमय आणि मंथन होणे आवश्यक असते. मुंबई फेस्टिव्हलच्या माध्यमातून या नाविन्यपूर्ण विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे. यामध्ये अनेक तज्ज्ञ मान्यवर आहेत. देशातील सर्वाधिक स्टार्ट अप आणि युनिकॉन हे एकट्या महाराष्ट्र राज्यात आहेत. कृषी क्षेत्रात 40 टक्के ‘स्टार्ट अप’ काम करत आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. राज्यात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि राज्याच्या विकासासाठी ‘स्टार्ट अप’ महत्त्वपर्ण भूमिका बजावतील, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, भारतात झालेल्या जी20 परिषदेचे ब्रीदवाक्य हे ‘वसुधैव कुटुंबकम्’ – ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी संकल्पना आहे. या माध्यमातून पर्यावरण पूरक जीवनशैली अंगिकारुन सर्वांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. शाश्वत विकासासाठी आपल्याला  भविष्याचा वेध घेऊन विकास धोरणे ठरवली पाहिजेत. सध्या जग हे जागतिक हवामान बदलाच्या प्रश्नाला सामारे जात आहे. जागतिक हवामान बदलामध्ये सर्वाधिक तीन प्रभावीत देशांपैकी एक देश भारत हा आहे. आपल्या देशातील बदलते हवामान बदल लक्षात घेऊन शेती आणि उद्योगांच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान येणे गरजेचे आहे.अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपाययोजना सूचवणाऱ्या स्टार्ट करिता शासन सहकार्य करून सुचवलेल्या उद्योगांमध्ये शासन गुंतवणूक करेल, असेही ते म्हणाले.

‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ मध्ये गेले पाच दिवस अत्यंत नाविन्यपूर्ण कार्यक्रम ठेवले आहेत. मनोरंजन आणि विविध स्पर्धांचा संगम असलेला महोत्सव आगामी कालावधीत नक्कीच आपल्या या वैविध्यपूर्ण उपक्रमांनी ओळखला जाईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

‘मुंबई फेस्टिव्हल 2024’  ‘टर्बो स्टार्ट’ अंतर्गत ‘पृथ्वीच्या संवर्धनासाठी’ या विषयावरील चर्चासत्रात स्वदेश फाऊंडेशनचे अध्यक्ष रोनी स्क्रूवाला, ड्रीम अकराचे संस्थापक हर्ष जय, इन मोबी ग्लोबल बेसचे संचालक विकास अग्निहोत्री, टर्बो स्टार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट राजू यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला, तर आयेशा फरीदी यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आठ वर्षे कार्यरत असलेले अंकित भाटेजा आणि राघव शर्मा, कचरा व्यवस्थापनात कार्यरत असलेले कबाडीवाला,आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या लिव्हप्रोटेक कंपनीच्या कामाबद्दल डॉ.राजा विजयकुमार आणि आलोक शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.

0000

संध्या गरवारे/वि.स.अ