निवडणूक गीत मतदारांना प्रेरित करेल – मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे

मुंबई, दि. २५ : राज्यातील मतदारांना ‘ये पुढे मतदान कर’ असे आवाहन करणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणूक गीताचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. हे गीत राज्यातील मतदारांना आपला मताधिकार बजावण्यासाठी प्रेरित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज मुंबईतील जयहिंद महाविद्यालात झालेल्या कार्यक्रमात या गीताचे आणि त्याच्या ध्वनीचित्रफितीचे प्रकाशन झाले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘स्वीप’ उपक्रमाअंतर्गत या गीताची निर्मिती केली आहे. गीतकार स्वानंद किरकिरे अध्यक्षस्थानी होते. अभिनेते सुबोध भावे, संगीतकार मिलिंद इंगळे, गायक राहुल सक्सेना, गायिका वैशाली माडे, रॅपर जे. सुबोध आणि कस्तुरी आफळे उपस्थित होते.

२५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आगोयाची स्थापना झाली. यानिमित्त सन  २०११ पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. तरुण मतदारांना प्रोत्साहित करून त्यांचा सत्कार करून आणि मतदार नोंदणी वाढवून निवडणुकीत लोकांचा सहभाग वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. याचा उपयोग मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि निवडणूक प्रक्रियेत माहितीपूर्ण सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी देखील केला जातो. हा दिवस राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, मतदारसंघ आणि मतदान केंद्रस्तरावर साजरा केला जातो, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे देशातील लोकशाही व्यवस्थेमुळेच आहे. ते टिकावे यासाठी मतदारांनी आपला मताधिकार बजावून या स्वातंत्र्याचे रक्षण करायला हवे, असे आवाहन श्री. किरकिरे यांनी केले. देशात होणाऱ्या आगामी सर्व निवडणुकांमध्ये मताधिकाराचा योग्य वापर करू या, ज्यांनी अजूनही मतदार म्हणून नोंदणी केलेली नाही, त्यांनाही नोंदणी करायला लाऊ या, असे अभिनेते श्री. भावे यांनी सांगितले. ते म्हणाले की, देशाचे सामान्य नागरिक हेच देशाचे खरे मालक आहेत. त्यांनी मतदानाच्या दिवशी आपला मताधिकार बजावायला हवा.

या गीताच्या लोकार्पणासोबतच राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नव मतदारांना मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच मतदारांना शपथही देण्यात आली. यावेळी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी मतदारांना दिलेल्या संदेशाची ध्वनीचित्रफितही दाखविण्यात आली.

प्रसिद्ध गायक राहुल सक्सेना आणि गायिका वैशाली माडे यांनी या गीताला आवाज दिला आहे. गीतकार समीर सामंत यांनी ते लिहिले आहे. संगीतकार मिलिंद इंगळे यांनी या गीताला संगीत दिले आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ‘स्वीप’ उपक्रमातील कर्मचारी निलीश कुंजीर यांनी या गीताच्या

ध्वनिचित्रफितीचे दिग्दर्शन केले आहे. या निवडणूक गीतासाठी भवदीप जयपूरवाले यांनी संगीत संयोजकाची, सुरेल इंगळे यांनी संगीत तंत्र संयोजकाची आणि यश पांडे यांनी ताल तंत्र संयोजकाची जबाबदारी  सांभाळली.

नागरिकांनी कर्तव्याने आपला मताधिकार बजावावा, कोणतीही प्रलोभने किंवा दबावाला बळी न पडता आपले मत द्यावे, असा संदेश या निवडणूक गीतामधून दिला आहे. हे गीत लोकशाहीतील सामाजिक धार्मिक वैविध्यतेचं प्रतिनिधीत्व करते. वर्णभेद आणि लिंगभेदाला दूर सारून लोकशाहीतील सर्वसमावेशकतेला चालना देते आणि त्यासोबतच मतदानाचा अधिकार हा समाजातल्या प्रत्येक घटकाला एकसमानतेच्या पातवळीवर आणणारा अधिकार असल्याचा संदेश या गीताच्या माध्यमातून देण्यात आला आाहे. या निवडणूक गीताला रॅप साँगचीही जोड दिली आहे. त्यातून युवकांना लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्यासाठी, आणि त्यात स्वतःचा सक्रिय सहभाग देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास यावेळी करण्यात आला. रॅपर जे. सुबोध आणि कस्तुरी आफळे यांनी या गीतातील रॅप साँगचा भाग गायिला आहे. या गीतासाठी जितेश कदम यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे.

००००००