वर्धा, दि.26 (जिमाका) : शेती व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन सातत्याने काम करत असते. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाची भरपाई त्यांना मिळावी यासाठी पिकविमा योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यात 44 हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 36 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
प्रजासत्ताकदिनाचा मुख्य ध्वजारोहन समारंभ येथील जिल्हा क्रीडा मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी ध्वजारोहन केले. त्यावेळी शुभेच्छा देतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नूरूल हसन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवळे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे उपस्थित होते.
सुरुवातीस जिल्हाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील शुरविरांना अभिवादन केले. देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य दिन जितका महत्वाचा आहे, तितकेच महत्व प्रजासत्ताक दिनाचे आहे. जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. घटनाकारांनी अतिशय दुरदृष्टीने तयार केलेल्या राज्यघटनेचे हे फलीत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेला आपला जिल्हा स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचे केंद्र राहिलेला आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
शेतकरी या देशाचा कणा आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली. या योजनेंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या 4 हजार 945 शेतकऱ्यांना 24 कोटी 21 लाखाचे प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच यावर्षी आतापर्यंत 73 हजारावर शेतकऱ्यांना 903 कोटीचे पिककर्ज वाटप झाले आहे.
प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत केवळ 1 रुपयात शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण उपलब्ध झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात पहिल्यांदाच 2 लाख 47 हजार विमा अर्ज प्राप्त झाले. या अर्जधारक शेतकऱ्यांच्या 2 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षण मिळाले आहे. रेशीम शेती फायद्याची आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती आहे. या शेतीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वळविण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. त्यामुळेच यावर्षी 511 शेतकऱ्यांनी 554 हेक्टर क्षेत्रासाठी नोंदणी केली आहे. विभागातील ही सर्वाधिक नोंदणी आहे.
इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवली जात आहे. या योजनेचे जिल्ह्याला 4 हजार 965 घरांचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत आपण 3 हजार 698 घरकुलांना मंजुरी दिली आहे. केंद्र शासनाने नुकतेच पीएम विश्वकर्मा योजना सुरु केली. पारंपारिक 18 प्रकारच्या कारागिरांना कौशल्य प्रशिक्षणासह कर्ज सुविधेचा लाभ योजनेतून मिळणार आहे. आतापर्यंत 2 हजार 970 कारागिरांनी नोंदणी केली आहे.
जिल्ह्यात महिला बचत गटाची चळवळ मोठ्या प्रमाणावर उभी राहिली आहे. गटांना आपल्या सक्षमिकरणासाठी बॅकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. गेल्यावर्षी 9 हजार 330 गटांना 279 कोटींचे वाटप करण्यात आले आहे. कर्जवाटपात जिल्हा आघाडीवर आहे.
सद्याचे युग हे डिजिटल माध्यमाचे युग आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय सेवा घरपोच देण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. त्यासाठी ‘सेवादूत’ नावाचा नाविन्यपुर्ण उपक्रम आपण सुरु केला. तालुकास्तरावरील सर्व कामकाज ई-ऑफिस प्रणालीने जोडले. वर्धा येथे सुसज्ज आपले सरकार सेवा केंद्र आपण सुरु केले. शंभरपेक्षा अधिक सेवा याठिकाणी एकाच छताखाली लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्र गतिमान करण्यासाठी ‘शिक्षण मित्र’ नावाचा उपक्रम आपण सुरु केला. शिक्षण विभागाच्या 20 सेवा या उपक्रमात घेतल्या. त्यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले. या सेवांना लोकसेवा हक्क कायद्याची जोड दिल्याने कालमर्यादेत या सेवा शिक्षक, विद्यार्थी, पालकांना उपलब्ध होणार आहे.
आज 74 वा प्रजासत्ताकदिन आपण साजरा करतो आहे. प्रजेची सत्ता अधिक मजबूत, बळकट आणि निकोप होण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणूकीत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने विशेषत: युवा वर्गाने मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी केले.
सुरुवातीस ध्वजारोहनानंतर राष्ट्रगित तसेच पोलिस व विविध पथकांद्वारे पथसंचलन करण्यात आले. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पोलिस विभागाच्यावतीने आपत्कालिन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात केले. मान्यवरांच्याहस्ते यावेळी पुरस्कारांचे वितरण व सत्कार करण्यात आले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन ज्योती भगत यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन संजय सुकळकर व सुधाकर वाघमारे यांनी केले.
000
प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण
Ø विरपत्नी, विरमातांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार
Ø पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान
Ø सांस्कृतिक कार्यक्रम व उत्कृष्ट संचलन पुरस्कार
भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते विविध पुरस्कारांचे वितरण व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अपर पोलिस अधीक्षक सागर कवळे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे उपस्थित होते.
यावेळी विरपत्नी व विरमातांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्यात विरमाता शांताबाई वरहारे, विरमाता नलीनी टिपले, विरपत्नी जयश्री चौधरी यांचा समावेश आहे. मतदार यादीच्या उत्कृष्ट कामासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना मुबंई येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्त मान्यवरांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी प्रियांका पवार यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरीबाबत उपजिल्हाधिकारी कल्पना गोडे, तहसिलदार रमेश कोळपे, नायब तहसिलदार शंकुतला पराजे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
सन 2023 मधील उत्कृष्ट लघु उद्योजकांचा प्रथम पुरस्कार मे.श्यामबाबा ट्रेन्डस हिंगणघाट, इंटिग्रेटेड टेक्सटाईल्स पार्क हिंगणघाटच्या संचालक सरिता शर्मा व निधी सुराणा यांना 15 हजार रुपयाचा धनादेश व द्वितीय पुरस्कार मे.नंदन कलर्स वर्धाच्या संचालक वृषाली हिवसे यांना 10 हजार रुपयाचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
सन 2020-21 चा जिल्हा क्रिडा पुरस्कार गुणवंत क्रिडा मार्गदर्शक पुरस्कार व्हॉलीबॉल खेळासाठी कपील ठाकुर, सन 2021-22 चा धर्नुविद्या खेळात गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला खेळाडू ओजस्वी साळवे, सन 2021-22 गुणवंत क्रिडा मार्गदर्शक पुरस्कार स्वप्नील राऊत, सन 2022-23 चा गुणवंत खेळाडू पुरस्कार शिवानी देवासे, सन 2022-23 चा गुणवंत क्रिडा मार्गदर्शक पुरस्कार मनिषा राऊत, सन 2023-24 चा गुणवंत खेळाडू पुरस्कार रुपेश गायकवाड व महिला खेळाडू लक्ष्मी घुगसकर व गुणवंत क्रिडा मार्गदर्शक पुरस्कार पदमाकर ढोक यांना मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.अभ्युदय मेघे व महात्मा गांधी इंस्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्स सेवाग्रामचे गिरीष देव यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनामध्ये शोध, बचाव व समन्वयाचे उत्कृष्ट कार्य केल्याबाबत राखीव पोलिस निरिक्षक कमलाकर घोटेकर व मंडळ अधिकारी प्रविण हाडे यांना सन्मानित करण्यात आले. उल्लेखनिय कार्य केल्याबाबत राष्ट्रपती पदक प्राप्त झालेल्या जिल्हा समादेशक होमगार्ड पलटन नायक रविंद्र चरडे व सार्जन्ट होमगार्ड पथक अमीत तिमांडे यांचि मान्यवरांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेज जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेता ठरलेले औद्योगिक प्रशिक्षण संस्था वर्धाचे अनिल तिमांडे, जी.एस. कॉलेजच्या मुर्तुजा अली, आर.जी.भोयर आर्ट, कॉमर्स, सायन्स कॉलेज सेलुचे राहुल थोरात यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कॅनरा बॅकेचे व्यवस्थापक नवीन सिंग व भारतीय स्टेट बँक शाखा सेवाग्रामच्या अस्मिता डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात झालेल्या पथसंचलनात उत्कृष्ट प्रथम पुरस्कार परेड कमांडर परिविक्षाधीन भारतीय पोलीस सेवेतील पोलिस अधिकारी वृष्टी जैन, द्वितीय पुरस्कार रुचिरा पात्रे तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार एनसीसी अभिषेक सोनवने, उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रथम पुरस्कार अग्रग्रामी हायस्कुल पिपरी, द्वितीय न्यू इंग्लीश कॉनवेंट तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार सेंट ॲथोनी स्कुलला देण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन ज्योती भगत यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन संजय सुकळकर व सुधाकर वाघमारे यांनी केले.
000