राजर्षि छत्रपती शाहु महाराज मार्गाचे काम दर्जेदार करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : राजर्षि छत्रपती शाहु महाराज मार्ग (१०० फुटी रस्ता) हा शहरातील प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदार करावे. सांगली व विश्रामबागची शोभा वाढेल, अशा पद्धतीने या रस्त्याचे काम देखणे व्हावे, असे प्रतिपादन राज्याचे कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले.

सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालिका अंतर्गत राजर्षि छत्रपती शाहु महाराज मार्ग (१०० फुटी रोड) च्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्योतिरामदादा पाटील कुस्ती आखाड्याजवळ आयोजित या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण आदि उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, १०० फुटी रस्ता वर्दळीचा रस्ता असून, या रस्ता कामातून तुमचा ठसा उमटला जाणार आहे. रस्ता तयार करताना नगरसेवक, कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते व नागरिक यांनी सहकार्य करावे. अतिक्रमण स्वयंस्फूर्तीने काढावे. सध्या ६० फुटी रस्त्याचे काम होत असून, त्यामध्ये अतिक्रमण व विजेच्या खांबांचे स्थलांतरण करण्यात येणार आहे. संपूर्ण १०० फूट रस्त्याचा प्रस्ताव लगेच करा, निधीची कमतरता भासू देणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार सुधीर गाडगीळ, आयुक्त सुनील पवार यांनी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन नकुल जकाते यांनी केले.

केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणूक निधीमधून हा रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्याची लांबी ३,८५० मीटर आहे. त्याची अंदाजपत्रकीय रक्कम जवळपास १५ कोटी, १७ लाख रूपये आहे. याअंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूला धावपट्टीचे २ मीटर रूंदीने रूंदीकरण, खडीकरण, मुरूमीकरण, सिलकोट, थर्मोप्लास्टीक पेंट, रस्ता दुभाजक व दुभाजकामध्ये वृक्षारोपण अशी कामे करण्यात येणार आहेत.

000