जानेवारी २०२४ साठी राष्ट्रीय शिधाजिन्नस परिमाण व दर जाहीर

मुंबई, दि. २९ :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जानेवारी २०२४ करिता कौटुंबिक शिधापत्रिकेवर शिधाजिन्नस वितरित करण्यासाठी परिमाण व दर जाहीर करण्यात आले आहेत.

प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत तांदूळ प्रति व्यक्ती तीन किलो व गहू प्रति व्यक्ती दोन किलो मोफत वितरित करण्यात येणार आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत तांदूळ प्रति शिधापत्रिका २० किलो, गहू १५ किलो मोफत, तर अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत साखर प्रति शिधापत्रिका एक किलो (२० रुपये किलो)  वितरित करण्यात येणार आहे.

केरोसिन एक व्यक्ती दोन लिटर प्रमाणे, दोन व्यक्ती ३ लिटर व ३ व्यक्ती पेक्षा जास्त ४ लिटर प्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. मुंबई शहर व उपनगरमध्ये बिगर गॅसधारकांना ६६.६१ रुपये प्रति लिटर प्रमाणे केरोसिन वितरित करण्यात येणार आहे. ठाणे विभागासाठी ६७.०० प्रति‍ लिटर प्रमाणे केरोसिन वाटप करण्यात येणार असल्याची माहिती नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

000

श्रद्धा मेश्राम/स.सं