सातारा दि. 30 (जि.मा.का) :- एका वर्षात कराड विमानतळाचे विस्तारीकरण आणि रात्रीच्या वेळी विमान सेवा सुरू करणे. या बाबीला प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन, उद्योगवाढीला चालना मिळणार आहे, असे कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपवनसरंक्षक आदिती भारद्वाज, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, विमानतळ प्राधिकरणाचे विभागीय व्यवस्थापक संतोष नलावडे, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते.
कराड विमानतळ विस्तारीकरण व नाईट लॅडींग हा विषय अनेक वर्षापासूनचा प्रलंबित आहे. 2012-13 मध्ये विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्याची असणारी 1 हजार 280 मीटरची धावपट्टी वाढवून ती 1 हजार 700 मीटर करण्यात येणार आहे.
विस्तारीकरणासाठी 48 हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. जवळपास 62 टक्के खातेदारांना भूसंपादनापोटी मिळणारा निधी शासनाने वितरीत केला आहे. उर्वरित खातेदारांना पंधरा दिवसांची नोटीस देऊन भूसंपादनाची भरपाई स्वीकारण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.
भरपाईची रक्कम न स्वीकारल्यास रकमेचा भरणा कोर्टात करण्यात येऊन जमीन ताब्यात घेण्यात येईल व संपादित जमिनीस लवकरात लवकर शासनाचे नाव लावण्याच्या कामास प्राधान्य देण्याचा निर्णय पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत झाला.
यावेळी एअरपोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडिया यांनी निर्धारित केलेल्या नियमानुसार जी बांधकामे, टॉवर्स अडथळा निर्माण करणारी ठरतील ती अतिक्रमणे काढण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देशही या बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
पवनचक्क्यांचे जिओ टॅगिंग करा
पाटण तालुक्यात 1 हजार 62 पवनचक्क्यांची नोंद असून उभारण्यात येणाऱ्या प्रत्येक पवनचक्कीची नोंद कटाक्षाने झालीच पाहिजे याबाबत यंत्रणांनी दक्षता घ्यावी. ग्रामपंचायतीने पवनचक्क्यांचे क्रमांक देऊन त्याचे जिओ टॅगिंग करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पाटण तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये पवनचक्क्या उभ्या आहेत त्या संबंधित कंपन्यांकडून ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या कराबाबतची आढावा बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, पाटणचे प्रांत सुनील गाडे, महाउर्जाचे महाव्यवस्थापक श्री. शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अर्चना वाघमोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात येणाऱ्या पवनचक्कयांना क्रमांक देण्यात यावेत असे सांगून, पवनचक्की कंपन्यांनी शासनाचा कर चुकवेगिरी करु नये यासाठी उभारण्यात आलेल्या पवनचक्क्यांमधून किती विद्युत निर्मिती होते याची तपासणी करण्यात यावी, अशा सूचना देऊन पालकमंत्री श्री. देसाई यांनी कर थकबाकी असणाऱ्या कंपन्यांना अंतिम नोटीस देऊन विहित मुदतीत भरणा न झाल्यास कारवाई करावी व थकबाकीदारांकडून व्याजासह वसुली करण्यात यावी, असेही निर्देश दिले.
मोरणा गुरेघर व वांग मराठवाडी प्रकल्पांचा आढावा
सातारा दि.30 : पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मोरणा गुरेघर व वांग मराठवाडी प्रकल्पांचा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आढावा घेतला.
या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, पोलीस अधीक्षक समिर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते.
मोरणा गुरेघर प्रकल्पांतर्गत उजवा व डावा कालवा हा बंदिस्त पाईपलाईन करावयाचा आहे. या कामाच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक घेऊन विशेष बाब म्हणून या कामाला मंजुरी घेण्यात येईल. त्याचबरोबर वांग मराठवाडी प्रकल्पातील पाटण तालुक्यातील जिंती व निगडे गावातील 261 कुटुंबांचे पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. याबाबतही पुनर्वसन मंत्री यांच्याशी बैठकीचे आयोजन करुन या पुनर्वसनासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी घेण्यात येईल.
वांग मराठवाडी प्रकल्पातील पाटण तालुक्यातील जिंती व निगडे प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी जलसंपदा विभागाकडे निधी उपलब्ध आहे. हा निधी पुनर्वसनासाठी देण्याबाबत पुनर्वसन विभागाची मंजुरीही घेण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.