सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज हे राज्यातील उत्तम रुग्णालय करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती निधीमधून 12 कोटी रूपयांच्या वेगवेगळ्या अत्याधुनिक मशीन मिरज सिव्हीलला दिल्या आहेत. ही अत्याधुनिक यंत्र व साधनसामुग्री दिल्याने गरीब, गरजू रूग्णांना याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे विविध अत्याधुनिक यंत्रसामुग्री व साधनसामुग्रीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे, डॉ. प्रियांका राठी यांच्यासह रूग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, मिरज सिव्हील रूग्णालयाला मेंदूची सर्जरी करण्यासाठी मायक्रोस्कोप आणि अन्य आवश्यक सर्व साहित्य दिले आहे, ज्यामुळे गोरगरीबांचे मोफत ऑपरेशन होईल. डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी विविध मशिनरी तसेच कान, नाक, घसा विभाग अत्याधुनिक करण्यासाठी विविध यंत्र सामग्री दिल्या आहेत. ॲनेस्थेशिया / भूलतज्ज्ञ विभाग, सर्जरी विभाग अद्ययावत केला जात आहे. सर्जरी आयसीयु अद्ययावत करण्यासाठी ॲडव्हान्स्ड आयसीयु बेड आणि मॉनिटर उपलब्ध केले आहेत. मेडीसीन आयसीयु सुधारणा व अद्ययावत करण्यासाठी डायलिसीस मशीन, युएसजी मशीन मॉनिटर, इको मशीन, सिरींज पंप असे अनेक उपकरणे दिली असल्याचे पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.