सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सविंदणे येथील ३४ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि  उद्घाटन

पुणे दि.३- राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शिरुर तालुक्यातील मौजे सविंदणे येथील ३४ कोटी ५० लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि  उद्घाटन करण्यात आले. शिरुर तालुक्यातील विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी श्री.वळसे पाटील यांनी दिली.

यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाशराव पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील, राजेंद्र गावडे, बाळासाहेब डांगे, सचिन पानसरे, सरपंच शुभांगी पडवळ आदी उपस्थित होते.

राज्य शासन महिलांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मधील कालावधीत कोरोना नियंत्रणाला प्राधान्य दिल्याने विकासकामांची गती कमी होती. मात्र आता विकासकामांना वेगाने सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रस्ते आणि पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबविण्याला प्राधान्य देण्यात आले असल्याचे श्री.वळसे पाटील यावेळी म्हणाले.

मौजे सविंदणे येथे जलजीवन मिशन अंतर्गत २४ कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना उभारण्यात येत आहे. मडके वस्ती येथील ओढ्यावरील पुल बांधणे १ कोटी ३८ लाख रुपये, जलसंधारण महामंडळा अंतर्गत गेटेड बंधारे २ कोटी ७१ लाख आणि ३ कोटी १० लाख रुपये खर्चाच्या पिराचा माळ ते कवठे येमाई रस्त्याच्या भूमिपूजनासह २२ विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले.

००००