लातूरच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे नूतनीकरण होणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे  

मुंबई दि. ६ :लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी तत्काळ २ कोटी रुपयांचा निधी देण्याचा तसेच संपूर्ण नूतनीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लातूर येथील अडचणी दूर करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

आमदार सतीश चव्हाण यांच्या मागणीवरून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार सतीश चव्हाण, आमदार रमेश कराड, महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदेचे संचालक हेमंत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ.जहागीरदार, गोविंदराव देशमुख तसेच मंत्रालयातील विविध अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव सादर करावा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकही शासकीय कृषी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी महाविद्यालय नसल्याने नवीन महिला कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी निधी मागणीचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्याचे निर्देश यावेळी मंत्री श्री. मुंडे यांनी दिले.

अद्रक संशोधन केंद्रास पळसवाडी येथील जमीन

कृषी विभागाने गल्ले बोरगाव, ता.खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उपलब्ध असणारी विद्यापीठाची जमीन अपुरी असल्यामुळे पळसवाडी येथील जमीन या प्रकल्पासाठी मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी विद्यापीठाने छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने जमीन मागणीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश  मंत्री श्री. मुंडे यांनी दिले.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ