ठाणे, दि. ८ : क्रीडा संकुलांच्या माध्यमातून देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडावेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोपरी येथील ठाणे तालुका क्रीडा संकुल उद्घाटन सोहळयाप्रसंगी केले.
ठाणे शहरातील तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज झाले.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी आमदार रवींद्र पाठक, माजी महापौर नरेश म्हस्के, क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, तहसीलदार युवराज बांगर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, तालुका क्रीडा अधिकारी तथा तालुका क्रीडा संकुलाच्या सदस्य सचिव सायली जाधव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी आनंदाचा दिवस आहे. खेळाडू आणि एक तंदुरुस्त पिढी घडविणाऱ्या या संकुलाचे उद्घाटन होत आहे. ठाण्याचा पालकमंत्री असल्यापासून या संकुलाच्या उभारणीचा साक्षीदार असून आज मुख्यमंत्री म्हणून त्याचे उद्घाटन करण्याचे भाग्य मिळाले आहे. या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून नवनवीन खेळाडूंना कसब दाखविण्याची संधी मिळेल. त्यातून ते जिल्हा, राज्य आणि देशाचे प्रतिनिधीत्व करतील.
मुख्यमंत्री म्हणाले की, ठाण्याला खेळ आणि खेळाडूंच्या विजयाचा मोठा इतिहास आहे. देशात आणि राज्यात नावाजलेले अनेक खेळाडू ठाण्यात झालेले आहेत. हनुमान व्यायाम शाळा, आनंद भारती, मावळी मंडळ, आर्य क्रीडा मंडळ या काही निवडक ठिकाणीच खेळण्याची संधी असे. व्यायाम करणे, स्थानिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्यापलिकडे कुणी खेळाकडे गांभीर्याने पाहत नव्हते. ही उणिव दादोजी कोंडदेव स्टेडियममुळे भरुन निघाली. तिथे आता अॅथलेटिक्सचे 6 ट्रॅक आखले गेले. उंच उडी, लांब उडी, गोळाफेक आदी खेळांना उत्तम व्यासपीठ मिळाले. क्रिकेटसाठी दोन खेळपट्ट्या तयार केल्या. दरवर्षी अॅथलेटिक्स, टेबलटेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट, कब्बड्डी, खो-खो इ. खेळांच्या राज्य व राष्ट्रीयस्तरावरील महापौर करंडक स्पर्धा ठाण्यात होतात. मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद मिळतो.
ठाणे तालुका क्रीडा संकुल हे या क्रीडा क्षेत्रातील पुढील पाऊल आहे. काळाची गरज ओळखून अत्याधुनिक सुविधांसह खेळाडू घडविण्याचे काम इथे होणार आहे. राज्यात खेळ आणि खेळाडूंना पोषक असे वातावरण आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ’ स्पर्धेचा शुभारंभ केला आहे. गेल्या महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक येथे युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील सर्वच राज्यातील युवा आणि खेळाडू त्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे तब्बल सात वर्षानंतर राष्ट्रीयस्तरावरचा हा युवा मेळावा आयोजित करण्याची संधी राज्याला मिळाली. ती आपण यशस्वी करून दाखवली.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारी पुढची पिढीही तितकीच सक्षम आणि तंदुरूस्त असणं आवश्यक आहे. त्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा, युवा मेळावे आयोजनासाठी प्रयत्न करीत आहोत. ठाण्याचा सुपूत्र रुद्रांक्ष पाटीलने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत देश आणि राज्याचे नाव मोठे केले. रुद्रांक्ष सारखेच अनेक गुणवान खेळाडू राज्यात आहेत. ते आपल्या जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर झळकवत आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये देखील आपल्या राज्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. मातीतल्या खेळांची परंपरा महाराष्ट्राला आहे. त्यातून शरीर तंदुरुस्त राहतेच पण मुलांची व्यक्तिमत्वाची जडणघडण होते.
मोबाईल, इंटरनेटच्या युगात मुले मैदानांपासून दुरावली आहेत, मुलांना पुन्हा मैदानी खेळाकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. त्यात पालकांची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी मुलांना खेळासाठी प्रोत्साहित करायला पाहिजे. सरकारही आपली जबाबदारी झटकणार नाही. शासनाच्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक तालुक्यात तालुका क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. ठाणे तालुक्यात तालुका क्रीडा संकुल निर्माण करण्यात आले आहे. कळवा येथे क्रीडा विभागाला 48 एकर जागा दिली आहे. भिवंडी, शहापूर, मुरबाड या तालुक्यांमध्ये देखील तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे.
उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण येथील तालुका क्रीडा संकुलांचा मेकओव्हर सुरू आहे. या सर्व क्रीडा संकुलांचा लाभ ठाणे जिल्ह्यामधील सर्व खेळाडूंना होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2036 मधील ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारत तयार असल्याचे जाहीर केले आहे. ऑलिम्पिंक स्पर्धेतले खेळाडू घडविण्यासाठी ही संकुले उपयुक्त ठरतील. हेच मिशन डोळ्यासमोर ठेवत ‘मिशन लक्ष्यवेध’ राबवत आहोत. राज्यात क्रीडा क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत त्यामध्ये तालुका, जिल्हा, विभागीय क्रीडा संकुलांच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारले जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठास 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. खेळांडूच्या प्रोत्साहनासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ करण्यात येणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील (एशियन गेम्स) पदक विजेते खेळाडू आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रकमेत दहापट वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मुला-मुलींनी विकसित करण्यात आलेल्या या सुविधांचा वापर करावा आणि क्रीडा क्षेत्रात आपली चमक दाखवावी, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, शासनाच्या सन 2012 च्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक तालुक्यात तालुका क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. त्यानुषंगाने ठाणे तालुक्यात तालुका क्रीडा संकुल निर्माण करण्याकरिता क्रीडा विभागाला शासनाकडून 2985.29 चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यात आली. शासनाकडून मिळालेला निधी 1 कोटी असून त्यामध्ये या संकुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकत नाही म्हणून तत्कालीन पालकमंत्री तथा मंत्री, नगरविकास, एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाचा 9 कोटी निधी उपलब्ध करून दिला. या तालुका क्रीडा संकुलास बांधण्यासाठी 4 कोटी अनुदान प्राप्त झाले असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमृता दीक्षित यांनी केले तर, आभार प्रदर्शन क्रीडा उपसंचालक श्री. फरताडे यांनी केले.
0000