नाशिक, दिनांक 9 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : यंदाच्या पावसाळ्यात पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे पाणी डोंगरगाव येथे पोहाेचेल यादृष्टीने या कालव्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे, असे निर्देश अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.
आज दिंडोरी तालुक्यातील मावडी, खडकजाम यासह विविध ठिकाणी पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांची व प्रकल्पाच्या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगरचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, नांदूर मध्यमेश्वर विभागाच्या कार्यकारी अभियंता संगिता जगताप, पुणेगाव कालव्याच्या उपविभागीय अभियंता योगिता घुगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, सद्य:स्थितीत एकूण १२ कि.मी , २८ कि.मी, ३५ कि.मी व ५२ कि.मी च्या टप्प्यांवर पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे काम सुरू आहे. यात प्रामुख्याने कालव्या दरम्यान स्ट्रक्चर आणि पुलांच्या कामास गती द्यावी. यासाठी आवश्यक त्याठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे व अधिकचे मनुष्यबळ लावून दर्जात्मक काम ३१ मे पूर्वी पूर्ण करण्यात यावे. यासाठी आवश्यक निधीची पूर्तता करण्यात आली असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
आजपर्यंत १२ कि.मी मध्ये २ कि.मी आणि ४९ कि.मी मध्ये ४ कि.मी असे एकूण ६ किमी लेव्हल काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे ४९ किमी मध्ये ९०० मीटर काँक्रीटीकरण काम झाले आहे. या कालव्यावर आजमितीस १२ किमी मध्ये ६ मशीन, २८ किमी मध्ये ६ मशीन तर ३५ किमी मध्ये ६ मशीन असे एकूण १८ मशीनने अतिशय गतीने काम सुरू आहे. या सुरू असलेल्या कामाची परिस्थिती पाहता निश्चितच कालव्याचे काम मे अखेर पर्यंत काँक्रीटीकरण करण्याचे काम १५ जून अखेर पूर्ण होणार असल्याचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे यांनी यावेळी सांगितले.
00000