क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंची शारीरिक क्षमता, मानसिक आरोग्य आण‍ि सांघिक भावना वृद्धिंगत होते : पालकमंत्री दादाजी भुसे

0
8

नाशिक, दिनांक 9 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा): आजच्या धकाधकीच्या जीवनात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने प्रत्येकाने यासाठी स्वत:ला वेळ देणे आवश्यक आहे. विविध प्रकाराचे छंद व खेळातून मानसिक ताणतणाव तर दूर होतोच परंतू क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंची शारीरिक क्षमता, उत्तम  आरोग्य आणि सांघिक भावना वृद्धिंगत होते. असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

आज विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, पंचवटी नाशिक येथे आयोजित परिवहन विभागाच्या राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव-2024 च्या उद‌्घाटनप्रसंगी मंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, परिवहन उपायुक्त भरत कळसकर, अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, सह सचिव परिवहन राजेंद्र होळकर, अवर सचिव परिवहन भरत लांघी, अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख, राजाभाऊ गिते, शैलेश कामत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही, उप विभागीय क्रिडा अधिकारी साळुंखे यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, 24 वर्षानंतर परिवहन विभागाला नाशिकमध्ये राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव -2024 च्या रूपाने आयोजनाची संधी मिळाली आहे. या तीन दिवसांत महाराष्ट्रातून येथे आलेल्या परिवहन परिवाराचे या निमित्ताने स्पर्धा, कार्यक्रमांसोबतच विचारमंथन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून आजचा हा योग जुळून आला आहे. परिवहन विभागाला या निमित्ताने नवीन ध्वज  मिळाला असून हा ध्वज पहिल्यांदाच निर्माण केला असून भविष्यात याच ध्वजाच्या माध्यमातून परिवहन विभाग कार्यरत राहणार आहे. नाशिकला या कार्यक्रमाचे यजमानपद मिळाले ही अभिमानस्पद बाब आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून नाशिकमध्ये नुकताच झालेला देशपातळीवरील राष्ट्रीय युवा महोत्सवात देशभरातून 8000 पेक्षा जास्त युवक सहभागी झाले होते. पोलीस प्रशासानाचा क्रीडा महोत्सवही आपल्या नाशिकमध्ये सुरू आहे. अशा विविध कार्यक्रमांमुळे आज नाशिकचे नाव अधोरेखित होत आहे ही गौरवाची बाब असल्याचे पालकमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.

पालकमंत्री दादाजी भुसे पुढे म्हणाले, मागील काळात परिवहन विभागात क्रीडा कोट्यातून जवळपास 50 अधिकारी सेवेत दाखल झाले आहेत. परिवहन विभागाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत. 43 प्रकारच्या सेवा ऑनलाईन झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय टळून त्यांचा वेळही वाचत आहे. वाहनचालकांना सुरक्षेच्या दृष्टीने प्रबोधन व्हावे यासाठी रस्ते सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून परिवहन विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मागील वर्षापासून अपघातांची आकडेवारी कमी होतांना दिसत आहे. परिवहन विभागासोबत, पोलीस प्रशासन व इतर यंत्रणा यांच्या समन्वयातून अपघातांच्या ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी विविध प्रकाराच्या सुविधा करणे, वाहनांची वाहतुकीनुसार लेन निश्चिती करणे याबाबी अंमलात आणल्यास निश्चितच अपघातांचे प्रमाण शुन्यावर येण्यास मदत होईल असा विश्वास पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

परिवहन आयुक्त विवेक भिमनवार प्रास्ताविकात म्हणाले, आज येथे होणाऱ्या स्पर्धांमध्ये वाहन विभागातील एकूण 24 विभागीय संघ व परिवहन आयुक्त कार्यालातील 1 संघ असे एकूण 25 संघानी सहभाग नोंदविला आहे. या क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण 22 प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होणार असून वैयक्तिक क्रीडा स्पर्धेमध्ये 445 स्पर्धकांनी तर सांघिक स्पर्धेमध्ये 200 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट, कबड्डी, हॉलिबॉल, रस्सीखेच, बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन टेनिस, धावण्याची शर्यत, स्विमिंग, शुटींग, कॅरम, बुद्धीबळ इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आला आहे.  विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र यावे व एकमेकांबद्दल आदरभाव निर्माण होवून सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे  हा एकमेव उद्देश या क्रीडा स्पर्धा आयोजनाचा असल्याचे परिवहन आयुक्त श्री. भिमनवार यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला  सर्व संघाच्या पथकांचे संचलन झाले. मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून व हवेत फुगे सोडून महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन झाले. यानंतर परिवहन विभागाच्या ध्वजाने अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच सर्व खेळाडूंना सामूहिक शपथ यावेळी देण्यात आली. यावेळी विविध जिल्ह्यातील रस्ते सुरक्षा जनजागृती करणाऱ्या चित्ररथाना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले.
000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here