रस्ता सुरक्षा मोहीम; ५५६ वाहनचालकांची आरोग्य तपासणी

मुंबई, दि. 09: रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहनचालकांची विनाशुल्क नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे आयोजित या तपासणी शिबिरात 556 वाहनचालकांची तपासणी झाली.

तपासणी केलेल्या वाहनचालकांमध्ये 42 वाहनचालकांना मोतिबिंदू, 38 वाहनचालकांना रेटीना संबंधित व्याधी, दूर व निकट दृष्टीदोष 58 वाहनचालकांना आणि दूर किंवा निकट दृष्टीदोष 109 वाहन चालकांमध्ये आढळून आला. ज्या वाहनचालकांना दृष्टीदोष आढळून आला आहे, अशा 159 वाहन चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विनाशुल्क चष्मे पुरविण्यात आले आहे. आरोग्य तपासणीमध्ये रक्तदाब असलेले वाहनचालक 50 व रक्तातील साखरेचे कमी – अधिक प्रमाण असलेले 38 वाहनचालक आढळून आले आहे.

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांनी शांतीलाल संघवी आय इन्स्टीट्युट वडाळा, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रूग्णालय, सायन व मुंबई टॅक्सीमेन्स असोसिएशन, मे. लायन्स क्लब व डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण दोन वेळा विनाशुल्क नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले होते. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहनचालक व मालकांचे कार्यालयामध्ये दररोज एक ते दीड तास समुपदेशन करून रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात येत आहे.

चालकांनी नियमितपणे आपल्या डोळ्यांची व आरोग्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. डोळ्यांची व आरोग्याची वेळोवेळी तपासणी न केल्यास अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही. तसेच चालक व त्यांच्या वाहनामध्ये प्रवास करीत असलेल्या प्रवाशांच्या जिवीतास धोका होऊ शकतो. वाहन चालकास कोणत्याही प्रकारचे दृष्टीदोष असल्यास त्वरित योग्य तो उपचार घ्यावा अन्यथा वाहन चालवू नये, असे आवाहन प्रादे‍शिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी केले आहे.

००००

नीलेश तायडे/विसंअ