मुंबई, दि. १२ :- कोयना प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न प्राधान्याने सोडवा, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज दिल्या. कोयना प्रकल्पग्रस्तांचे येत्या काही महिन्यात १०० टक्के पुनर्वसन करण्याबाबत मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
बैठकीस पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सांगली डॉ. राजा दयानिधी, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. पुनर्वसन विभागाचे उप सचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल, श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर हे प्रत्यक्ष उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले, कोयना प्रकल्प पुनर्वसित लाभार्थीस देय जमीन वाटप करताना न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे. पात्र लाभधारकास जमीन देण्याबाबतचे प्रस्ताव मान्यतेसाठी शासनास सादर करावेत. सातारा जिल्हाधिकारी यांनी पात्र लाभार्थींच्या याद्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना द्याव्यात.
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या महसूल, वन, ऊर्जा या विभागाकडील प्रलंबित प्रश्नाबाबत संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी. तसेच पुनर्वसितांच्या वसाहतीमध्ये नागरी सुविधा देणे व गावठाण संदर्भात निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर बैठकीचे आयोजन करून हे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.
०००
एकनाथ पोवार/विसंअ/