मराठी ही ज्ञानभाषा, अर्थार्जनाची भाषा होण्यासाठी पुढाकार घ्यावा – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

0
6

मुंबई, दि. 12 : मराठी भाषेच्या संवर्धनाच्या अनुषंगाने विविध विषयांची वर्गवारी करून ते विषय विद्यापीठांना द्यावेत, या विषयावर संशोधन करणाऱ्या संशोधक आणि त्यांच्या मार्गदर्शकांना शालेय शिक्षण विभागामार्फत अनुदान देण्यात यावे, तसेच ते संशोधन शाळा महाविद्यालयांमधून संदर्भ ग्रंथ म्हणून वापरण्यात यावे, असे निर्देश शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. याअनुषंगाने उच्च शिक्षण विभागासोबत करार करण्याची सूचना त्यांनी केली. राज्य मराठी विकास संस्थेची बैठक दर तीन महिन्यांनी आयोजित करुन या बैठकीस सर्व विद्यापीठांच्या मराठी भाषा विभाग प्रमुखांना निमंत्रित सदस्य म्हणून उपस्थित राहण्यास सांगावे असेही त्यांनी सांगितले. पुस्तकांचे गाव विस्तार योजनेत जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचा तर कवितेचे गाव योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभादांडाचा समावेश करून ही योजना तातडीने राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यकारी समितीची बैठक मंत्री श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, मराठी भाषा विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव, कार्यकारी समिती सदस्य डॉ.गणेश चंदनशिवे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे, प्रशासकीय अधिकारी तथा सदस्य सचिव गिरीश पतके आदी उपस्थित होते.

मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संवर्धन व्हावे हे विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने विविध विषयांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. मंत्री श्री.केसरकर म्हणाले, शिक्षण विभागाच्या विविध ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशी पुस्तके, ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करून द्यावेत. ग्रंथ तयार करताना शेवटच्या पानावर वाचकांच्या सोयीसाठी ग्रंथाबाबतचे संक्षिप्त वर्णन द्यावे. तसेच विश्वकोशमध्ये ग्रंथसूची खंडाची नोंद घ्यावी. मराठी ग्रंथसूचीचे खंड सर्व ग्रंथालयात संग्रही ठेवावेत. दुर्मिळ ग्रंथांचे संगणकीकरणाद्वारे जतन करून उत्कृष्ट साहित्य महाजालावर उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार उपक्रम राबविला जाणार आहे, यादरम्यान त्यांना उत्कृष्ट वाचन करायला लावावे तसेच मराठी गाणी ऐकवावी. मराठीबाबतच्या विविध ऐतिहासिक बाबींची विद्यार्थ्यांना माहिती करून द्यावी.

बोलीभाषेच्या प्रसारासाठी विशेष प्रकल्प

महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्ये मराठीच्या विविध बोली बोलल्या जातात. त्यांचा भाषा वैज्ञानिक अभ्यास करून बोलीभाषेच्या प्रसारासाठी विशेष प्रकल्प राबविण्याचे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी दिले. सर्व कार्यालयांमध्ये महाराष्ट्रातील रहिवाशांसोबत मराठीतच बोलले पाहिजे, असे आवाहन करून बोलीभाषा संवर्धनासाठी पारितोषिक देण्याची सूचनाही त्यांनी केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील 860 गावांमध्ये मराठी भाषेसंदर्भातील विविध उपक्रम राबविण्यासाठी अनुदान देण्याचे निर्देश देऊन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींना मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात अनुदानाचे वितरण करण्याची सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी केली. मुंबईसह महाराष्ट्रात मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करण्याला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्याकरिता पाठपुरावा करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश देऊन राज्याबाहेर वाराणसी, पानिपत आदी ठिकाणी मराठी भाषा उपकेंद्र स्थापन करण्याची सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी केली.

अमळनेर होणार पुस्तकांचे गाव तर उभादांडा या कवितेच्या गावाच्या कामाला गती

पुस्तकांचे गाव योजनेचा विस्तार करून राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम तातडीने सुरू करून तेथे वाचकांना सर्वोत्कृष्ट पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पुढील टप्प्यात ही योजना तात्काळ सुरू करावी. त्याचप्रमाणे कवितांचे गाव योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभादांडा येथील कामाला गती द्यावी, असे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी दिले. मराठी कवींच्या दर्जेदार रचना सर्वांपर्यंत पोहोचाव्यात यादृष्टीने त्यांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेत कवितांसारखेच रुपांतर करण्याची सूचना त्यांनी केली. मराठी भाषा सर्वांच्या तोंडी रुळावी या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आकर्षक जिंगल्स तयार करून सर्वत्र ऐकवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here