ग्रंथ आहेत जीवनाची प्रेरक शक्ती -ऋषिकेश कांबळे
छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका):- मानवी जीवनाच्या प्रवासाच्या उद्वहनाचे विवेचन ग्रंथांमध्ये केले जाते. या जीवनाच्या परिक्रमेचा वेध घेण्यासाठी ग्रंथाशिवाय उपाय नाही. ग्रंथ हेच जीवनाची प्रेरक शक्ती आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी आज येथे केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यांच्या विद्यमाने समता दर्शन वाचनालय सभागृह, समता नगर येथे ‘छत्रपती संभाजीनगर ग्रंथोत्सव 2023’ चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे आज उत्साहात उद्घाटन झाले.
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले ग्रंथदिंडीचे स्वागत
प्रारंभी सकाळी क्रांती चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. तेथे राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. तसेच श्री. सावे यांनी ग्रंथोत्सवास शुभेच्छा दिल्या. ग्रंथदिंडीत त्यात विद्यार्थी व साहित्यप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला. ग्रंथ दालनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, सहाय्यक संचालक ग्रंथालय सुनील हुसे, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास, ग्रंथालय संघाचे कार्यवाह गुलाबराव मगर, कैलास पब्लिकेशनचे कैलास आतकरे, राजशेखर बालेकर, समता दर्शन संस्थेच्या अध्यक्ष वर्षा वासाडीकर यांच्यासह विद्यार्थी, नागरिक आणि ग्रंथ प्रेमींची उपस्थिती होती.
ग्रंथांतून मिळते सामर्थ्य
ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक ऋषिकेश कांबळे की, मनाची जोपासना ग्रंथ करत असतात. ग्रंथ वाचनातून भावनांची प्रेरक शक्ती प्राप्त होत असते. जीवनाचे संकल्प करण्याचे आणि ते प्रत्यक्ष आणण्याचे सामर्थ्य ग्रंथामधून व्यक्तीला मिळत असते. जीवन विकासाच्या प्रक्रिया समजून घेण्यासाठी ग्रंथाशिवाय उपाय नाही. उत्क्रांतीची प्रक्रियात श्रद्धा,प्रेम, आदरद्वेष, करुणा अशा विविध भावनांची ग्रंथाच्या वाचनातून माणसाला प्रचिती येते. संत वाड.मयाने परोपकाराची, समतेची भावना आपल्या साहित्यातून वाढीस लावली व माणूस म्हणून जगण्याची भावना केंद्रस्थानी ठेवून समतेचा संदेश दिल. ग्रंथ वाचनातून सर्व भावनांचे प्रगटीकरण होत. अनुभवसिद्धता मानवाला वाचनातून येत असते. अभिव्यक्तीसाठी ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले.
बुधवार दि.१४ चे कार्यक्रम
दुसरा दिवस सकाळी 11 वा. मंथन विषय ‘वाचन संस्कृती संवर्धानात माझा खारीचा वाटा’, अध्यक्ष डॉ. दादा गोरे, सहभाग दै.सकाळ चे मराठवाडा आवृत्ती संपादक संतोष शालीग्राम, लेखाधिकारी शरद भिंगारे, साहित्यिक डॉ. ललित अधाने, साईबाबा वाचनालयाचे सचिव दुष्यंत आठवले, प्रकाशक भास्कर सरोदे.दुपारी 2 वा. परिसंवाद विषय : सार्वजनिक ग्रंथालयाच्या विकासासाठी विविध योजना, दुपारी 4 वा.समारोप होईल. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. धर्मराज वीर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, मसापचे कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे यांची उपस्थिती असेल.
ग्रंथोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, समन्वय समिती सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, शिक्षणाधिकारी (माध्य) एम.के.देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, कार्यवाह मसाप डॉ. दादा गोरे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुभाष सोळंके आदींनी केले आहे.
00000