लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवा- डॉ. भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका):- ज्या योजनांचा लाभ दिल्याने लोकांचे विशेषतः दारिद्र्य रेषेखालील लोकांचे जीवनमान उंचावते अशा योजना प्रभावीपणे राबवून लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणले पाहिजे,असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज डॉ. कराड यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. प्रभारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच सर्व विभागप्रमुख बैठकीस उपस्थित होते.

बैठकीत केंद्राच्या विविध योजना तसेच राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी बचतगटांना द्यावयाचा अर्थपुरवठा, चांगले काम करणाऱ्या गटांना कर्ज उपलब्ध करुन देणे, शहरी व ग्रामिण भागातील बचत गटांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. तसेच उज्ज्वला गॅस योजना, आयुष्मान भारत कार्ड योजना, रेशन कार्ड व त्यामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ याबाबतही डॉ. कराड यांनी आढावा घेतला. ते म्हणाले की, आयुष्मान कार्ड ही योजना म्हणजे आरोग्याची काळजी घेणारी योजना असून लोकांना आरोग्यावर होणारा आकस्मिक खर्चाचा भार कमी करणारी ही योजना आहे. तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजना अशा योजना ह्या गरिबांना अर्थ सहाय्य करणाऱ्या योजना असून त्यातून रोजगाराला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक योजनेसाठी लाभ घेतांना आधार कार्ड संलग्नता असणे आवश्यक असून त्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करावे,सए निर्देश डॉ. कराड यांनी दिले.

०००००